Pune Protest: वंचितच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; विविध संघटनांचा महामोर्चा
Pune Protest: आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि भीम आर्मीसह अनेक संघटनांचा पाठिंबा; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी.

Pune Protest – दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि वाढत्या दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आज पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानंतर पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला.
ऐतिहासिक भिडेवाडा येथून सुरू झालेला हा भव्य मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (पुणे स्टेशन) येथे पोहोचला. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या महामोर्चात धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो आणि दिल्ली पोलीस मुर्दाबाद, अशा केंद्र सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात पुणेकरांचा हा जनसागर रस्त्यावर उसळलेला पाहायला मिळाला. या बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय), आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भीम आर्मी, लहुजी परिवर्तन आघाडी, रिपब्लिकन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीसह अनेक प्रमुख संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला.
सर्व सहभागी घटकांनी संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन पार पाडत बंद यशस्वी केल्याचा दावा संघटनांनी केला आहे. याप्रसंगी वसंत साळवे, डॉ. अनिल जाधव, ॲड. अरविंद तायडे, राहुल डंबाळे, अनिस अहमद यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





