पिंपरी, (प्रतिनिधी) – महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांवर महापालिकेने टाकलेला विश्वास गतवर्षी सार्थ ठरविल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुन्हा एकदा मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप बचत गटातील महिलांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला सिध्दी 2.0 प्रकल्प असे नाव देण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचे समन्वयन व पर्यवेक्षण राज्य शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने गतवर्षीप्रमाणेच 2024-25 या आर्थिक वर्षात महिला बचत गटातील महिलांमार्फत मालमत्ता कराची बिले वाटपासाठी सिध्दी 2.0 हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात 6 लाख 25 हजार निवासी, व्यावसायिक, औद्योगिकसह इतर मालमत्ता आहेत.
गतवर्षी या मालमत्ता धारकांना महिला बचत गटाच्या माध्यातून घरोघरी बिले पोहच करण्याचा महत्वाचदीा निर्णय महापालिकेने घेतला होता. अवघ्या ड महिन्यात पालिकेच्या इतिहासात प्रथमच 100 टक्के मालमत्ता धारकांना बिले घरपोच मिळाली होती. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेवून 447 कोटी रूपये म्हणजे 50 टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात या विभागाला यश आले होते.
एका बिलासाठी महिलांना मिळणार 20 रूपये
मालमत्ता कराचे बिल वाटण्यासाठी महापालिकेच्या वतीने महिलांना गतवर्षी एका बिलासाठी 15 रूपये देण्यात आले होते. मात्र, यंदा यामध्ये वाढ करून प्रत्येक बिलासाठी 20 रूपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक महिलेला दोन हजारपेक्षा जास्त बिले वाटपाचे काम देण्यात येणार नाही.
यावर्षी देखील सिध्दी अॅपच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. यावेळचे सिध्दी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बिले वाटपासंदर्भात महिलांना कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
मालमत्ता धारकाचा मोबाइल क्रमांक हा एसएमएस पाठविण्याच्या दृष्टीने व सर्व सेवा ऑनलाइन मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पालिकेच्या सर्व सेवा ओटीपी बेस असल्यामुळे मालमत्ता धारकाने आपला अचूक मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे. यंदा अॅपमधून ओटीपीव्दारे शहानिशा केली जाणार आहे.
त्यामुळे जास्तीत-जास्त मोबाइल क्रमांक मिळण्यास आणि नागरिकांचा व्यक्तिगत डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. यंदाही पहिल्या तिमाहीत पाचशे ते साडे पाचशे कोटी रूपयांपर्यंत मालमत्ता कर वसूल होईल, अशी आशा सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
गतवर्षी तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त महिलांना अवघ्या दिड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला. बचत गटातील महिलांना पारंपारिक क्षेत्र सोडून हे एक रोजगाराचे नवे दालन पालिकेने खुले केले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून अॅपमध्ये मालमत्ता धारकाचा मोबाईल क्रमांक पडताळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सेवेमध्ये तत्परता, पारदर्शकता वाढेल. नागरिकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहण्यास मदत होईल. नागरिकांनी मोबाईल क्रमांकाची पडताळणी करावी. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका