नवी दिल्ली – वीर सावरकरांच्या पोस्टरवरून कर्नाटकात वाद अजूनच चिघळत चालला आहे. यापूर्वी शिवमोग्गा येथील भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांनी मुस्लिम तरुणांना नियंत्रणात राहण्यास सांगितले होते. आता श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुथालिक यांचे आक्षेपार्ह विधान समोर आले आहे. जर कोणी सावरकरांच्या पोस्टरला हात लावला तर त्यांचे हात कापले जातील असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यन, कर्नाटकातील शिवमोग्गा येथे सावरकरांचे पोस्टर लावण्यावरून पूर्वी वाद झाला होता. एका गटाने सावरकरांच्या जागी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आले.
राम सेना राज्यभर सावरकरांची पोस्टर्स लावणार
दुसरीकडे या वादाच्या भोवऱ्यात श्रीराम सेनेने वीर सावरकरांचे पोस्टर्स राज्यभर लावण्याचे जाहीर केले आहे. प्रमोद मुथालिक म्हणाले, वीर सावरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांची १५ हजार पोस्टर्स राज्यभर लावण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकर मुस्लिमांविरुद्ध लढले नाहीत. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि ब्रिटिशांविरुद्ध लढले. असा इशारा देताना मुथालिक म्हणाले की, मुस्लिम किंवा काँग्रेसमधील कोणीही त्यांच्या पोस्टरला हात लावल्यास त्यांचे हात कापले जातील. हा माझा इशारा आहे.
भाजप आमदार म्हणाले होते, हिंदू जागा झाला तर..
यापूर्वी शिवमोग्गा येथील भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांचे वक्तव्य पोस्टरच्या वादानंतर समोर आले होते. ते म्हणाले होते की, मी मुस्लिम समाजातील ज्येष्ठांना आवाहन करतो की, देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या समाजातील तरुणांवर नियंत्रण ठेवावे. हिंदू समाज जर आक्रमक झाला तर अशा कारवाया होणार नाहीत आणि देशद्रोही टिकणार नाहीत.
वादाचे कारण काय होते?
शिवमोग्गा पोलिसांनी सांगितले की,’टिपू सुलतानच्या अनुयायांच्या एका गटाने 15 ऑगस्ट रोजी शहरातील अमीर अहमद सर्कलमध्ये टिपू सुलतानचे बॅनर लावण्यासाठी वीर सावरकरांचे बॅनर काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. कलम 144 तात्काळ लागू करण्यात आले आहे. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. सावरकर हे हिंदुत्वाचे विचारवंत होते, तर टिपू सुलतान हे १८व्या शतकातील म्हैसूरचे शासक होते. बॅनरवरून दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीत प्रेमसिंग नावाच्या तरुणाला चाकूने वार करत मारण्यात आले.’