Shraddha Kapoor : ‘स्त्री 2’च्या यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका वेगळ्या आणि प्रेरणादायी भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या नव्या बायोपिक चित्रपट ‘ईथा’ साठी होकार दिला असून, या चित्रपटात ती महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी नर्तकी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. लावणीच्या रंगभूमीवर झळकलेली ‘तमाशा सम्राज्ञी’ विठाबाई नारायणगावकर या तमाशा आणि लावणीच्या जगतातील एक दैदिप्यमान नाव आहे. त्या काळात, जेव्हा समाजात महिलांना रंगमंचावर स्वतःची कला सादर करणे कठीण होते, तेव्हा विठाबाई यांनी आपल्या कलेने नवे मापदंड घालून दिले. त्यांच्या मेहनतीने, जिद्दीने आणि लावणीवरील प्रेमाने त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. म्हणूनच त्यांना ‘तमाशा सम्राज्ञी’ असे संबोधले जाते. श्रद्धा कपूर या चित्रपटात विठाबाईंचा संघर्ष, कलेप्रती त्यांचे समर्पण आणि समाजाशी लढा या सर्व भावनांना पडद्यावर जिवंत करताना दिसणार आहे. ही श्रद्धाच्या करिअरमधील पहिली बायोपिक फिल्म असल्याने तिच्यासाठी हा अनुभव अत्यंत खास आणि आव्हानात्मक ठरणार आहे. श्रद्धाची तयारी आणि भूमिकेचं गांभीर्य श्रद्धाने या भूमिकेसाठी विशेष तयारी केली आहे. लावणीच्या तालावर प्रभुत्व मिळवण्यासाठी तिने अनुभवी लोककलाकारांकडून प्रशिक्षण घेतलं आहे. तसेच मराठी लोकसंस्कृती, पोशाख आणि नृत्यशैली यांचा सखोल अभ्यास केला आहे. तिच्या जवळच्या सूत्रांच्या मते, श्रद्धा ही भूमिका “भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास” म्हणून पाहते आणि ती पूर्ण ताकदीने या भूमिकेत उतरली आहे. ‘छावा’नंतर लक्ष्मण उतेकरांचा नवा प्रयोग दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याआधी ‘लुका छुपी’, ‘मिमी’ आणि अलीकडील सुपरहिट ‘छावा’ सारख्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘छावा’च्या ऐतिहासिक यशानंतर आता ते श्रद्धासोबत एक वेगळी आणि प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणत आहेत. प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट ‘ईथा’ या चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की तो 2026 च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल. या बातमीने श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी “श्रद्धाचा नवा अवतार पाहायला उत्सुक आहोत” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.