Pimpri News : मराठी मातीचा जादुई झंकार ; फोक प्रबोधनाने रसिक मंत्रमुग्ध

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – मराठी भाषेचे माधुर्य, लोकसंगीताची लय आणि मातीच्या गंधात रुजलेली लोकपरंपरा…या तिन्हींचा सुरेल संगम पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने सादर झालेल्या ‘फोक प्रबोधन’ कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवला. लोककलांच्या सजीव स्वरांनी, नृत्यांच्या तालांनी आणि मराठी अस्मितेच्या ओलाव्याने भरलेला हा सोहळा केवळ कलात्मक मेजवानी नव्हे, तर मराठी संस्कृतीच्या शतकांपूर्वीच्या लोकसंस्कृतीच्या ठेवा नवपिढीपर्यंत पोहचविणारा ठरला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘फोक प्रबोधन’ हा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘पिंगळा महाद्वारी’ आणि ‘आला वासुदेव तुमच्या दारी’ या मराठी संस्कृतीच्या सांस्कृतिक वाहकांच्या प्रतिकांच्या कलात्मक सादरीकरणातून झाली. लोककलांचा प्रवास या कार्यक्रमातून पुढे जात असताना ‘गोंधळी’ परंपरेचे दर्शन घडवले गेले. शाहीरी परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘चमके शिवबाची तलवार’ या गजरात उजळून निघाला. त्यानंतर बासरीवादन, वारकरी भजन आणि ‘ज्ञानेश्वर माऊली, जय जय विठ्ठल’ च्या गजरात रंगमंचावर कलाकारांनी दिंडी सोहळा साकारला. रंगमंचावरच काही क्षणात वेशभूषा बदलत सादर करण्यात आलेल्या ‘आल्या पाच गवळणी’ या भारूडाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या समर्पित कलाजीवनाचा आलेख मांडणारी लावणी सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. भैरवीने कार्यक्रमाचा मनमोहक शेवट झाला.
पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी ठरली शिखरबिंदू..
बासरी, ढोलकी, डफ, पखवाज, दिमडी, चवंडक, ताशा, हलगी, संबळ, ढोल, टाळ, घुंगरू, हार्मोनियम, झांज, कोल्हापुरी हलगी, तुणतुणे, चंडा अशा पारंपरिक वाद्यांच्या सुमधूर तालाने संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. महाराष्ट्राच्या मातीतील लय, ठेका आणि सूर यांचा संगम घडवत या वाद्यांची अप्रतिम जुगलबंदी साकारली गेली. वाद्यांच्या तालावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले, तर कलाकारांनी आपल्या कौशल्याने रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला. पारंपरिकतेचा साज आणि आधुनिक सादरीकरणाची झळाळी यांचा सुंदर मेळ साधत या कार्यक्रमातील ही वाद्यजुगलबंदी खऱ्या अर्थाने शिखरबिंदू ठरली.





