Shraddha Kapoor Video : श्रद्धा कपूरची मराठमोळी अदा पाहून चाहते फिदा.! लावणी कलावंतांसोबत धरला फुगडीचा फेर
श्रद्धानेही क्षणाचाही विलंब न करता तिच्यासोबत फुगडीचा फेर धरला. लावणी कलावंतांसोबतचा तिचा हा आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून या व्हिडीओचं कौतुक केलं जात आहे.

Shraddha Kapoor Video : बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या एका वेगळ्याच अंदाजामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ना तिचा ग्लॅमरस लूक चर्चेत आहे, ना एखादा रोमँटिक सीन! तर चक्क मराठमोळा साज, पारंपरिक साडी, लावणीचा ठसका आणि फुगडीचा भन्नाट फेर! श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात असंच काहीसं पाहायला मिळालं.
मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध प्लाझा थिएटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रद्धाने विंटेज कारमधून खास अंदाजात एन्ट्री घेत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या अस्सल लावणी कलावंतांसोबत तिने मनमुराद आनंद लुटला. एवढंच नाही, तर एका लावणी कलावंताच्या आग्रहाखातर श्रद्धाने चक्क फुगडीचा फेर धरला.
View this post on Instagram
यावेळी श्रद्धानेही आपल्या नखरेल अदांनी आणि उत्साही स्वभावाने सर्वांची मनं जिंकली. एका लावणी कलावंताने तिला फुगडी घालण्याचा आग्रह केला. मग काय, श्रद्धानेही क्षणाचाही विलंब न करता तिच्यासोबत फुगडीचा फेर धरला. लावणी कलावंतांसोबतचा तिचा हा आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून या व्हिडीओचं कौतुक केलं जात आहे.
View this post on Instagram
विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात श्रद्धा महाराष्ट्राच्या तमाशा आणि लावणी क्षेत्रातील दिग्गज कलावंत विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी श्रद्धाने मराठी संस्कृती, लावणी आणि तमाशाच्या विश्वाशी जोडलेला खास अंदाज आत्मसात केला आहे.
या चित्रपटात श्रद्धासोबत मोहम्मद झिशान अय्यूब, सिद्धार्थ जाधव आणि अनंत जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘छावा’ फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन या चित्रपटाचे निर्माते आहेत. ४ डिसेंबर २०२६ रोजी ‘ईठा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






