TOP 15 NEWS : भारतीय पर्यटकांना मोठा झटका ते काँग्रेसमध्ये महत्वाचे फेरबदल….; जाणून घ्या TOP 15 NEWS
आतापर्यंत मलेशियात ३० दिवस व्हिसाशिवाय प्रवेश मिळत होता. मात्र, १ जानेवारी २०२७ पासून ही सुविधा बंद होणार आहे. म्हणजेच आता मलेशियाला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा घेणं अनिवार्य असेल.

TOP 15 NEWS : 1. भारतीय पर्यटकांना मोठा झटका; मलेशियाला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर बातमी नक्की पाहा…
परदेशात फिरायला जाणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी! मलेशियाला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आताच सावध व्हा. कारण भारतीय पर्यटकांना मोठा झटका बसणार आहे. आतापर्यंत मलेशियात ३० दिवस व्हिसाशिवाय प्रवेश मिळत होता. मात्र, १ जानेवारी २०२७ पासून ही सुविधा बंद होणार आहे. म्हणजेच आता मलेशियाला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा घेणं अनिवार्य असेल.
विशेष म्हणजे, १ डिसेंबर २०२६ पासून MyVISA ऑनलाइन पोर्टलवर व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. पण सावधान! अर्ज सात कामकाजाच्या दिवसांत पूर्ण केला नाही किंवा पेमेंट प्रलंबित राहिलं, तर अर्ज आपोआप रद्द होणार आहे. एवढंच नाही, व्हिसा नाकारला तरी भरलेली फी परत मिळणार नाही.
2. जगातील तीन महासत्ता एकत्र.! ट्रम्प, पुतिन आणि जिनपिंग यांचा ऐतिहासिक शांतता जाहीरनामा
जगाच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड! अमेरिका, रशिया आणि चीन या तीन महासत्तांचे प्रमुख एकाच व्यासपीठावर आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे व्लादिमिर पुतिन आणि चीनचे क्षी जिनपिंग यांची चीनमधील शेन्झेन शहरात ऐतिहासिक बैठक झाली. तब्बल ९० मिनिटांच्या चर्चेनंतर तिन्ही देशांनी संयुक्त शांतता जाहीरनामा प्रसिद्ध केला.
‘आण्विक युद्ध कधीच जिंकता येत नाही आणि ते कधीही होऊ नये,’ असा स्पष्ट संदेश या नेत्यांनी दिला. संयुक्त राष्ट्रांत सुधारणा आणि जागतिक सुरक्षा मजबूत करण्यावरही सहमती दर्शवण्यात आली. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलपुरवठा सुरू राहण्याबाबत ट्रम्प यांनी भाष्य केलं, तर पुतिन यांनी युक्रेनसह प्रादेशिक संघर्षांचा उल्लेख केला.
3. इस्लाम ख्रिश्चन धर्माला टाकणार मागे! २०३५ पर्यंत होणार मोठा बदल; संशोधनातून धक्कादायक अंदाज!
जगाच्या धार्मिक लोकसंख्येचं चित्रच बदलणार असल्याचा मोठा दावा एका संशोधन अहवालातून करण्यात आला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, इस्लाम धर्माची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून २०३५ पर्यंत मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांच्या संख्येला मागे टाकू शकते. २०२० मध्ये जगभरात २.२७ अब्ज ख्रिश्चन, तर २.०२ अब्ज मुस्लिम होते. मात्र, २०३५ पर्यंत मुस्लिमांची संख्या २.५७ अब्ज, तर ख्रिश्चनांची संख्या २.५२ अब्ज होण्याचा अंदाज आहे.
या वाढीमागे मुस्लिम समुदायातील तुलनेने जास्त जन्मदर आणि तरुण लोकसंख्या ही प्रमुख कारणं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, २०७० पर्यंत मुस्लिमांची संख्या ३.६ अब्जांवर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
भारताबाबतही या अहवालात महत्त्वाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुस्लिम लोकसंख्येचा वाटा वाढण्याची शक्यता असली, तरी २०७० पर्यंत भारतात हिंदूंची लोकसंख्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
4. देशभरात हवामानाचा डबल अटॅक! १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, ‘अकवान’ चक्रीवादळाचा कहर
देशभरातील हवामानाने अचानक धोक्याची घंटा वाजवली आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे दाट धुकं, तर कुठे मुसळधार पावसाचा इशारा! बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अकवान’ या तीव्र चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर संकट घोंगावत आहे. हवामान विभागाने २० नोव्हेंबरसाठी अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून, ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. ओडिशातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्येही पावसाची शक्यता आहे. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुक्याचा इशारा आहे.
5. करसवलती दिल्या, आता कर्मचाऱ्यांचे पगार का वाढवले नाहीत? पंतप्रधान माेदींनी उद्योजकांना सुनावले….
सरकारने करसवलती दिल्या, उद्योगांसाठी अनेक निर्णय घेतले; पण त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना काय मिळालं? असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींना केला आहे. फिक्कीच्या वार्षिक सभेत बोलताना मोदींनी उद्योजकांना चांगलंच सुनावलं.
१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? नवीन रोजगार निर्माण केले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्राहकांची क्रयशक्ती वाढली आहे, मग त्याचा फायदा उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
इतकंच नाही, तर ‘निर्यात दर्जा’च्या नावाखाली भारतीय ग्राहकांना दुय्यम उत्पादने देण्यावरही मोदींनी नाराजी व्यक्त केली. आता सरकारकडून सवलती मिळाल्या, तर उद्योगजगतानेही कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घ्यावा, असा स्पष्ट संदेश मोदींनी दिला आहे.
6. काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! ८३ सचिवांची नियुक्ती; सचिन सावंतांना तेलंगणाची जबाबदारी
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा मोठा धडाका पाहायला मिळतोय! ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तब्बल ८३ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील नेते सचिन सावंत यांच्यावर तेलंगणा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रासाठी यू.बी. व्यंकटेश, रेहान चिस्ती, योगींदर योगी आणि एफ. जक्कापणवार यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद दळवी यांना पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या नियुक्त्यांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः मुलाखती घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नव्या टीमकडून आगामी काळात काय कामगिरी होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
7. केंद्र सरकारमध्येच फितुरी? भाजपचे मंत्री विरोधकांच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
केंद्रातील सत्ताधारी भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय? खुद्द भाजपचे काही मंत्रीच विरोधकांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हा गौप्यस्फोट केला. हे मंत्री सरकारमधील अंतर्गत घडामोडींची माहिती विरोधकांना देत असल्याचा त्यांचा दावा आहे.
एवढंच नाही, तर भाजपची अंतर्गत संघटनात्मक रचना कोलमडली असून पुढील आठ महिन्यांत त्याचे परिणाम दिसतील, असंही त्यांनी म्हटलंय. भाजपची विचारधारा निष्प्रभ केल्याचा दावाही राहुल गांधींनी केला.
8. तुकाराम मुंढेंची धडक कारवाई.! २.२३ कोटींचा अन्नसाठा जप्त, ७ जणांना अटक
राज्यात भेसळखोर आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात छापेमारी करत तब्बल २ कोटी २३ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. २३ परवाने निलंबित, तर आठ विनानोंदणी विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.
भिवंडीत अन्नपदार्थांची मुदत आणि एमआरपी खोडून फेरछपाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पुण्यातील जे. एम. रोडवरील खाऊ गल्लीतही कारवाई करण्यात आली. पंढरपूर, मुंबई, नागपूर आणि नाशिकमध्येही तपासणीचा धडाका सुरू आहे.
दुसरीकडे, प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा १६ लाख ४२ हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, चार गुन्हे दाखल करत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भेसळखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
9. मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! असा आहे राज्य सरकारचा ‘पाताल लोक’ प्लान
मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबईतील वाहतूक कोंडीला थेट जमिनीतूनच उत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तब्बल ३१ किलोमीटरच्या एकात्मिक भूमिगत रस्ता बोगदा प्रणालीचा आराखडा सादर करण्यात आला.
या ‘पाताळ लोक’ प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसी, बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई विमानतळ आणि पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार आहेत. एवढंच नाही, तर भाईंदर-उत्तन ते विरार सागरी सेतूचा सुधारित आराखडाही मांडण्यात आला. त्यामुळे मुंबई ते वाढवण जोडणीसह संपूर्ण एमएमआरमधील प्रवासाचा चेहरामोहराच बदलण्याची शक्यता आहे.
10. सरकारी रुग्णालयातच आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; तीन महिन्यांपासून सिटीस्कॅन मशीन बंद; गरीब रुग्णांचे हाल, उपचारांसाठी वणवण
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगावमधील सरकारी रुग्णालयांची धक्कादायक अवस्था समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही ठिकाणची सिटीस्कॅन सेवा ठप्प असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
विशेष म्हणजे, खामगावमध्ये दररोज ३० ते ४० सिटीस्कॅन होत होते. मात्र, २८ जुलैपासून ही सेवा बंद आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत हजारो रुपये मोजावे लागत आहेत, तर काहींना अकोल्याला पाठवलं जात आहे.
तिथेही तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप आहे. वेळेवर निदान न झाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. आता आरोग्य प्रशासनाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे/
11. माणगावकरांवर पाणीटंचाईचं संकट? काळ नदीची पाणीपातळी घटली, पाण्यावर विचित्र थर; पालकमंत्री भरत गोगावलेंची धाव
रायगडच्या माणगावमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळ नदीची पाणीपातळी झपाट्याने घटत असून, नदीच्या पाण्यावर विशिष्ट प्रकारचा थरही आढळून आला आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री भरत गोगावले यांनी काळ नदीची प्रत्यक्ष पाहणी करत पाणीसाठ्याचा आढावा घेतला.
दरम्यान, नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आता काळ नदीच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार आणि माणगावकरांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
12. मुकुंदवाडी सिग्नलवर एसटी बसचा मृत्यूचा थरार! चालकाला अचानक भोवळ, अन् बसची ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव एसटी बसमुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी सिग्नलवर बस चालवत असताना चालकाला अचानक भोवळ आली आणि क्षणात बसवरील त्याचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर अनियंत्रित एसटी बसने रस्त्यावरील चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली.
या धडकेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून, काही जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. भोवळ आलेल्या चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ वाहतुकीचाही खोळंबा झाला.
13. रोहित पठारे मृत्यू प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे; आतापर्यंत २३ आरोपींना बेड्या; वैजापुरात पोलिसांचा कडक इशारा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रोहित अनिल पठारे मृत्यू प्रकरणाने आता मोठं वळण घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास अधिक सखोल आणि पारदर्शक व्हावा, यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे.
अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली तपासाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल २३ आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वैजापूरमध्ये सामाजिक शांतता राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, चिथावणीखोर संदेश पसरवू नयेत आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
14. पायांना ८ किलोचे घुंगरू, तासन्तास सराव अन् डोळ्यांत अश्रू! लावणी शिकताना श्रद्धा कपूरची झाली दमछाक; ‘ईठा’साठी घेतली प्रचंड मेहनत
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री श्रद्धा कपूर आता थेट मराठमोळ्या लावणीच्या तालावर थिरकणार आहे. मात्र, पडद्यावर लावणी सादर करण्यासाठी तिला अक्षरशः घाम गाळावा लागला आहे.
आगामी ‘ईठा’ चित्रपटासाठी श्रद्धाने दोन्ही पायांना प्रत्येकी चार किलो, म्हणजेच तब्बल आठ किलो वजनाचे घुंगरू बांधून तासन्तास सराव केला. लावणी शिकताना तिच्या डोळ्यांत पाणीही आलं.
सुरुवातीला लावणीबद्दल फारशी माहिती नसलेल्या श्रद्धाने कलाकारांचा संघर्ष, भावना आणि या कलेचा आत्मा समजून घेतला. सरावादरम्यान तिला दुखापतही झाली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
15. ‘आम्ही बाटलीच्या झाकणाने करायचो बॉल टॅम्परिंग…”, ‘सँडपेपरगेट’ वादानंतर अख्तरची खळबळजनक कबुली
ऑस्ट्रेलियन माजी फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या पुस्तकात २०१८ च्या ‘सँडपेपरगेट’ चेंडू छेडछाड प्रकरणाची माहिती संपूर्ण संघाला असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या वादानंतर सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टनेही केवळ तीन खेळाडूंना बळीचा बकरा बनवल्याचा दावा केला, तर कर्णधार पॅट कमिन्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या वादावर गोंधळ न घालण्याचा सल्ला देत धक्कादायक कबुली दिली आहे. ‘विस्डेन’शी बोलताना अख्तर म्हणाला की, पूर्वी इंग्लंडमध्ये आम्ही सँडपेपरऐवजी बाटलीच्या झाकणाचा वापर करून चेंडूशी छेडछाड करायचो; रिवर्स स्विंगसाठी हा संपूर्ण संघाचाच निर्णय असतो, मात्र सत्य समोर आणण्याची वेळ अधिक चांगली असू शकली असती.










