पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगर भागात पावसाच्या सरी कोसळल्या. नऱ्हे, धायरी, खडकवासला, पाषाण, कोरेगाव पार्क भागात जोरदार पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.राज्यात आज मान्सूनने पुणे, मुंबईसह बहुतांश भाग व्यापला आहे. त्यामुळे पुणे शहरात आजही सकाळीच पावसाने हजेरी लावली.
दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. मागील 48 तासात चार ते पाच अंशाने तापमानात घट झाली असून, 30 अंशाच्या पुढे असलेले तापमान आज 27.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. धरणक्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्यामुळे पुणेकर सुखावले आहे. पावसाचा जोर वाढावा आणि लवकर धरणे भरावी, असे साकडे वरूणराजाकडे नागरिकांकडून घातले जात आहे.
सकाळ आणि सायंकाळी नऱ्हे, धायरी, खडकवासला, पाषाण, कोरेगाव पार्क यासह विश्रांतवाडी, कोथरूड, बाणेर, कात्रज, धनकवडी या भागातही पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रविवार सुट्टीचा दिवस त्यात पावसाची हजेरी यामुळे काही भागात वाहतूक कोंडी झाली होती. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पादचारी नागरिकांची चालताना तारेवरची कसरत होत आहे. विशेषत: बसस्थानकाच्या ठिकाणी पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढतोय
जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढत असून, सिंहगड, गिरीवन, ताम्हीणी घाट, लोणावळा, खंडाळा याठिकाणी जोरदार सरी पडत आहे. पावसाने हजेरी लावताच पर्यटकही घाटमाथ्यासह पर्यटनस्थळी फिरायला बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, पावसामुळे घाटमाथ्यावर दरड कोसळण्याची भिती अधिक असून, पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.