मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊतांवर टीका केली होती. त्याला शिवसेनेने “लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी किरीट सोमय्यांचा जुना व्हिडीओ दाखवला आहे. त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडी चौकशीला घाबरूनच नारायण राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
दुसऱ्या एका व्हिडीओत नरेंद्र मोदी हे एनडीएचे खोटारडा उमेदवार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये नितेश राणे हे किरीट सोमय्यांवर आरोप करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये नितेश राणे म्हणतात की, किरीट सोमय्या हे मराठी भाषेच्या विरोधात असून त्यांनी मुंबईच्या शाळांमध्ये मराठीच्या सक्तीला विरोध केला. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी साऊथ मुंबई ही व्हेजिटेरियन झोन जाहीर करा, अशी मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
तसेच राजन तेलींनी नितेश राणेंवर केलेल्या आरोपाचा एक जुना व्हिडीओही यावेळी शिवसेनेने शेअर केला आहे. नारायण राणेंचे जुने व्हिडीओ असेच टप्प्याटप्याने लावणार असल्याचेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.