Sharad Pawar: पवारांच्या एका भेटीने बदललं चित्र? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचा मोठा दावा
Sharad Pawar: "मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो होतो..." दिल्लीतील आंदोलनानंतर शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची पडद्यामागची गोष्ट.

Sharad Pawar – नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी देशातील युवाशक्तीच्या एकज़ुटीच्या माध्यमातून देशासह देशाबाहेरही विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या युवाशक्तीच्या एकजुटीमुळेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकारला घ्यावा लागला. केंद्र शासन युवाशुक्ती पुढे झुकले आहे. या शासनाला उशीरा का होईना पण शहाणपण सुचले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर तरुणाईने सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा दिला. आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र शासनामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी झालेल्या या चर्चेचाच परिणाम म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटीने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. युवा पिढीने शांततेने आणि संयमाने आपल्या भावना देशातील नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आले. युवा पिढीने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो होतो, त्यांना विनंतीही केली केली होती. लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. संवाद न ठेवण्याचे दुष्परिणाम होत असतात.
संवाद सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेतले पाहिजे. आंदोलनकर्त्यांशी बोलायचेच नाही, असा हट्ट धरू नका, असे पंतप्रधान मोदींना सांगितल्याचेही पवार यांनी नमूद केले. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. नव्या पिढीला हाताळत असताना लाठीमार, अश्रुधूर असे प्रकार जर टाळले असते तर अधिक चांगले होईल, असेही पवार यांनी नमूद केले आहे.
देशातील लोकशाहीने कात टाकली…
युवा आंदोलकांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा आहे. देशातील लोकशाहीने कात टाकली आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जाते, हे निश्चितपणे नमूद करावसे वाटते. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिल्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे आभार मानत असल्याचेही शरद पवार यांनी नमूद केले.






