नवी दिल्ली – पंजाबमधील एका गुरूद्वाऱ्यात एक महिला सरोवरजवळ (पवित्र तलाव) बसून दारू पित होती. तेथून जाणाऱ्या युवकाने हे पाहिले आणि त्याला राग अनावर झाला. त्याने आपल्याजवळच्या रिवॉल्वरमधून तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले. धार्मिक स्थळी अशी घटना घडल्याने स्थानिकांकडून हालहाल व्यक्त केली जात आहे.
श्रध्देच्या ठिकाणी ती असे कृत्य करत असल्याचे पाहून आपला राग अनावर झाला आणि त्यातून आपण तिच्यावर गोळ्या झाडल्या असे त्या मारेकरी युवकाने म्हटले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. परविंदर कौर असे मृत महिलेचे नाव असून तिला मारणाऱ्याचे नाव निर्मलजित सिंग सैनी असे आहे.
मृत महिला 30 वर्षांची आहे. तिच्याजवळ एक पर्स, दारूची बाटली आणि तंबाकु सापडली. पर्समधील चिठ्ठीवरून ती दारू सोडण्याचे उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिच्या कुटुंबातील कोणीही सदस्य पुढे आले नाहीत. सैनीकडे रिवॉल्व्हरचा परवाना होता. त्याने एकूण पाच गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या लागल्यावर महिला जागेवरच मरण पावली. यात अन्य एक जण जखमी झाला आहे, मात्र त्याला कोणता धोका नसल्याचे सांगण्यात आले.
या धक्कादायक प्रकारानंतर सैनीला जेंव्हा न्यायालयात आणण्यात आले तेंव्हा शीख समुदायातील काही नागरिकांनी त्याच्यावर पुष्पवर्षाव केल्याचं सांगितलं जात आहे. समोर असलेलं सर्व चित्र पाहून आपल्याला संताप अनावर झाला व त्यामुळेच आपण ही कृती केल्याचे सैनीने म्हटले आहे. पोलीस दप्तरी सैनी याच्या नावावर अन्य कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.