पुणे -राज्यशासनाने येत्या सोमवारपासून (दि.4) करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार पुणे शहरातील इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी मान्यता दिली. मनपा हद्दीसह पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी हे आदेश लागू असतील. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना शाळांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच हे वर्ग सुरू करावे लागणार आहेत.
शहरी भागात 8 वी ते 12 चे वर्ग करोना प्रतिबंधक नियम तसेच पालकांचे संमतीपत्रक घेऊन शाळा सुरू करण्यास राज्यशासनाने मागील आठवड्यात मुभा दिली आहे. मात्र, त्याचवेळी हे अधिकार स्थानिक प्रशासनास दिले आहे. पुणे शहरात पाच महिन्यांपूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला होता. तर गणेशोत्सवानंतर शहरात करोनाची तिसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.
मात्र, प्रत्यक्षात शहरातील रुग्णसंख्या कमालीची घटली असून लसीकरणही वेगाने सुरू आहे. त्यामुळे नवी रुग्णसंख्या स्थिरावली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार, शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून तयारी दर्शविली जात आहे तर काही पालक तिसऱ्या लाटेच्या भीतीने दिवाळीपर्यंतची वाट पाहावी, अशी भूमिका घेतली जात होती. मात्र, अखेर पालिका प्रशासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत संभ्रम दूर केला आहे.
दर 15 दिवसांनी शिक्षकांची चाचणी
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळा सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी करोना चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच या सर्वांची प्रत्येक 15 दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. शाळेत तसेच शाळेबाहेर मुलांमध्ये किमान 6 फूट अंतर असणे बंधनकारक आहे. पाल्यास शाळेत पाठवत असल्याबाबत पालकाची लेखी संमती असणे आवश्यक असून, शिक्षकांच्या चाचण्यांचे अहवाल शाळेत ठेवणे बंधनकारक आहे.