SBI Q3 Results: सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 35 टक्क्यांनी घसरून 9,164 कोटी रुपयांवर आला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 14,205 कोटी रुपये होता.
SBI ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून 1,18,193 कोटी रुपये झाले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 98,084 कोटी रुपये होते.
समीक्षाधीन तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 1,06,734 कोटी रुपये झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 86,616 कोटी रुपये होते. बँकेचा NPA (Non Performing Assets) डिसेंबर 2023 अखेर सकल कर्जाच्या 2.42 टक्क्यांवर घसरला, जो एका वर्षापूर्वी 3.14 टक्के होता. त्याचप्रमाणे, निव्वळ NPA देखील गेल्या वर्षीच्या 0.77 टक्क्यांवरून तिसऱ्या तिमाहीअखेर 0.64 टक्क्यांवर घसरला आहे.
एकत्रित आधारावर, एसबीआय समूहाचा निव्वळ नफा डिसेंबर 2023 च्या तिमाहीत 29 टक्क्यांनी घसरून 11,064 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 15,477 कोटी रुपये होता. तथापि, समीक्षाधीन तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून 1,53,072 कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,27,219 कोटी रुपये होते.
डिसेंबर 2023 च्या तिमाहीत, बँकेने SBI पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड मधील SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेड (SBICAPS) चा संपूर्ण 20 टक्के हिस्सा विकत घेतला. यासह, एसबीआय पेन्शन फंड्स प्रायव्हेट लिमिटेडमधील बँकेची हिस्सेदारी 60 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. हा सौदा 229.52 कोटी रुपयांना झाला होता.