कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीला अतिआत्मविश्वास आला आणि प्रचारात कमी पडल्याने पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही पराभवात मोठा वाटा होता, असे पाटील (Satej Patil) यांनी नमूद केले. “आम्ही सगळेच याला जबाबदार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरची ‘तिखट’ बदनामी मुलाखतीदरम्यान सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या राजकारणाबरोबरच स्थानिक खाद्यसंस्कृतीवरही भाष्य केले. कोल्हापुरी मिसळीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “तिखट… तिखट… म्हणून कोल्हापूरची बदनामी झाली आहे.” त्यांनी आपल्या आवडीच्या मिसळ ठिकाणांचाही खुलासा केला. “तंदूर, आहार, फडतरे आणि बावड्यातील चव्हाण मिसळ मला खूप आवडते,” असे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या यशामुळे गाफील राहिलो पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले प्रचंड यश हे पराभवाचे एक कारण ठरले. “राहुल गांधी यांनी देशभरात भाजप सरकारच्या राज्यघटना विरोधी कारवायांविरुद्ध वातावरण तयार केले होते. भारत जोडो यात्रेद्वारे जनजागृती झाली होती. पण विधानसभा निवडणुकीत आम्ही जागा वाटपावर जास्त वेळ घालवला. जर हा निर्णय लवकर झाला असता, तर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला असता,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “लोकसभेतील यशामुळे आम्हाला विधानसभेतही सहज यश मिळेल, असा समज झाला. यामुळे आम्ही गाफील राहिलो. दुसरीकडे, भाजपने आमच्या १२ हजार बूथवर लक्ष केंद्रित करत रणनीती आखली.” ‘लाडकी बहीण’ योजनेने फिरवली निवडणूक सतेज पाटील यांनी महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा निवडणुकीतील परिणामांवर मोठा प्रभाव पडल्याचे सांगितले. “हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेळापत्रक बदलण्यात आले. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. निवडणुका पुढे ढकलण्याचा फायदा महायुतीने घेतला. लाडकी बहीण योजनेची घोषणा करून पुढील तीन महिन्यांचे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. याचा थेट परिणाम मतांवर झाला,” असे त्यांनी नमूद केले. योजनेच्या नावाखाली भीती निर्माण पाटील पुढे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात सरकारी खर्चातून लाडकी बहीण योजनेचे मेळावे आयोजित करण्यात आले. सोशल मीडिया आणि जाहिरातींद्वारे ‘ही योजना आम्ही आणली, महाविकास आघाडी सत्तेत आली तर ती बंद होईल’ अशी भीती महिलांमध्ये पसरवण्यात आली. या रणनीतीमुळे महायुतीला यश मिळाले,” असे त्यांनी स्पष्ट केले. सतेज पाटील (Satej Patil) यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाला अतिआत्मविश्वास, अपुरा प्रचार आणि महायुतीच्या योजनात्मक रणनीतीला जबाबदार धरले. त्यांच्या मते, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक काळजीपूर्वक नियोजन आणि सक्रिय प्रचाराची गरज आहे.