सातारा – येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उच्च माध्यमिक विभागाने (राज्यशास्त्र विषय) विद्यार्थ्यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाचा अभ्यास दौरा केला. जिल्हा व सत्र न्यायालयाची रचना, अधिकार व कार्ये आणि प्रशासकीय व्यवस्था इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाऊन घेतली.
यावेळी दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालयाची विद्यार्थ्यांनी पाहणी करून प्रशासनाविषयी माहिती घेतली.
अभ्यास दौऱ्यादरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायालयास भेट दिली. विधी साक्षरता अभियानाविषयी ॲड. आशिष राठोड, ॲड. आकाश महांगडे यांनी लोकन्यायालयासंदर्भात माहिती दिली. मोफत विधी सहाय्य, लोकन्यायालयाचे फायदे, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण प्राधिकरणचे अधीक्षक दीपक देसाई यांनी केले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपप्राचार्य गणेश पाटील, पर्यवेक्षिका सौ. आसावरी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. अभ्यास दौऱ्याचे समन्वयक म्हणून जी. बी. लोहार यांनी काम पाहिले. दौऱ्यासाठी 35 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना भारतीय न्यायव्यवस्थेची, जिल्हा व सत्र न्यायालयाची रचना, न्यायालयाचे अधिकार यासंबंधीची प्रत्यक्ष माहिती व्हावी या हेतूने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता, असे प्रा. जी. बी. लाेहार यांनी सांगितले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी प्रा. अजित फाळके, शेखर होरहट्टी यांनी परिश्रम घेतले.
दररोजच्या चार भिंतीच्या आत शिक्षण घेत होतो. अभ्यासाव्यतिरिक्त या अभ्यास दौऱ्यात जिल्हा व सत्र न्यायालयाची प्रशासकीय कामकाज आणि कोणकोणते खटले चालविले जातात यासंदर्भात पहिल्यांदाच जवळून अभ्यास करता आला, त्याचा आनंद होत आहे.
– सृष्टी शेडगे (विद्यार्थिनी, राज्यशास्त्र विषय)