Sarasbaug Pune : निर्णय आयुक्तांचा, प्रसिद्धी महापौरांची! सारसबाग बंदप्रकरणी सर्वपक्षीय टीकेनंतर महापौरांची सारवासारव
Sarasbaug Pune : प्रशासकीय निर्णयाची माहिती महापौरांच्या सोशल मीडियावरून आधीच लीक; ठराविक धर्माला लक्ष्य केले जात असल्याच्या टीकेनंतर दिलं स्पष्टीकरण.

Sarasbaug Pune : धार्मिक तेढ आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी महापालिकेने सारसबाग गुरुवार, शुक्रवार म्हणजे २८, २९ मे अशा दोन दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आयुक्तांनी घेतला असला, तरी त्याची माहिती महापौर मंजूषा नागपूरे यांनी सोशल मीडियावर जाहीर केली. त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका झाल्यावर महापौरांना सारवासारव करण्याची वेळ आली.
तसेच, ही पोस्ट सोशल मीडिया टीमकडून चुकून प्रसिद्ध झाल्याचा खुलासाही त्यांना करावा लागला. दरम्यान, या प्रकरणी निर्माण झालेला गोंधळ वाढत गेल्यानंतर अखेर पालिकेच्या उद्यान विभागाने अधिकृत जाहीर निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये पोलिसांकडून शहरात १४ दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे नमूद करत, त्यामुळे दोन दिवस सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाण असलेले सारसबाग उद्यान सुरक्षेसाठी दोन दिवसांसाठी सर्वसामान्य नागरिकांना पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. २८ मे रोजी बकरी ईद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आहे तर २९ मे रोजी वासी ईद आहे. यामुळे शहरात कोणताही धार्मिक वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतल्यानंतर पुढील दोन दिवस परिसरात बंदोबस्त ठेवण्याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आले. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी २८ मे रोजी सारसबागेत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यासाठी मपालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र, सावरकरांचा पुतळा सारसबागेच्या मुख्य परिसराबाहेर असल्याने उद्यान विभागाने ही परवानगी नाकारली. त्याच दिवशी बकरी ईद असल्याने धार्मिक मुद्द्यांवरून वाद निर्माण होण्याची किंवा सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता प्रशासनाने पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
महापौरांची सारवासारव
सारसबाग बंद ठेवण्याची अधिकृत माहिती पालिकेने जाहीर करणे अपेक्षित असताना, ती सर्वप्रथम महापौरांच्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर आली. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ठराविक धर्माला लक्ष्य केले जात असल्याची टीकाही झाली. तसेच, महापौर शहराच्या प्रथम नागरिक असून त्या घटनात्मक पदावर असल्याची जाणीवही अनेक नेटकऱ्यांनी करून दिली. या टिकेनंतर महापौरांना स्पष्टीकरण द्यावे लागले.
पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी दुरुस्तीच्या कामासाठी सारसबाग बंद असल्याचे नमूद केले होते. दुसऱ्या पोस्टमध्ये पोलिसांच्या आदेशानुसार सारसबाग बंद ठेवल्याचे म्हटले होते. त्यानंतर महापौरांनी आपल्या टीमकडून चुकून प्रभागातील बागेच्या दुरुस्तीची पोस्ट प्रसिद्ध झाल्याचा खुलासा केला. तसेच, आपण प्रशासनाच्या निर्णयाची माहिती दिली होती, असे सांगत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणी महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.






