Pune News : शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; न्यायालयीन कामकाज ठप्प
धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचा परिणाम दिवसभरातील सुनावण्यांवर झाला. सोमवारी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रकरणांचे कामकाज होऊ शकले नाही.

Pune News – शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर पाठविण्यात आल्याने सोमवारी (ता. २) न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
दुपारी अडीचच्या सुमारास हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज तातडीने थांबविण्यात आले. तसेच संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.
धमकीची माहिती मिळताच न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आले. न्यायाधीश आणि कर्मचारी अशोका हॉलसमोरील मैदानात जमा झाले होते. बॉम्बशोधक पथक न्यायालय परिसरात दाखल झाले असून, धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येत आहे.
अचानक न्यायालय परिसर रिकामा करण्यात आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील वाहतुकीवरही परिणाम होऊन काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
धमकीचा ई-मेल नेमका कोठून आणि कोणी पाठविला, याचा तपास सुरू असून, बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतरच पुढील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
आजच्या प्रकरणांना पुढील तारीख
धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचा परिणाम दिवसभरातील सुनावण्यांवर झाला. सोमवारी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रकरणांचे कामकाज होऊ शकले नाही.
त्यामुळे आज सुनावणी असलेल्या प्रकरणांना पुढील तारीख देण्यात आली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकार आणि वकिलांना पुन्हा न्यायालयात यावे लागणार आहे.
पुण्यासह इतर जिल्ह्यांतील न्यायालयांनाही धमकीचे ई-मेल
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाबरोबरच अहिल्यानगर आणि अन्य काही जिल्हा न्यायालयांच्या प्रशासनालाही अशाच स्वरूपाचे धमकीचे ई-मेल पाठविण्यात आल्याची माहिती आहे. एकाच वेळी विविध जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे संदेश मिळाल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे.
संबंधित न्यायालयांमध्येही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. या ई-मेलमागे एकच व्यक्ती किंवा यंत्रणा आहे का, तसेच धमकी देण्यामागील नेमका उद्देश काय आहे, याबाबत तपासातून माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.






