Pune Saras Baug : पुण्यात चाललंय काय? सारसबाग देखील दोन दिवस बंद राहणार; दिलं हे कारण
ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

Pune Saras Baug : पुणेकरांच्या जिव्हाळ्याची आणि शहरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेली ‘सारसबाग’ आणि येथील प्रसिद्ध ‘तळ्यातलं गणपती मंदिर’ पुढील दोन दिवस नागरिकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दि. २८ आणि २९ मे रोजी नागरिकांना सारसबाग परिसरात प्रवेश करता येणार नसल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
सुरुवातीला प्रशासनाकडून मंदिर आणि परिसर दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही वेळातच प्रशासनाने आपली भूमिका बदलत सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सारसबाग आणि मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय हा पुणे पोलिसांनी घेतला आहे. महापौर म्हणून मी केवळ पुणेकरांना याची माहिती दिली. (Pune Saras Baug)

Pune Saras Baug : पुण्यात चाललंय काय? सारसबाग देखील दोन दिवस बंद राहणार; दिलं हे कारण
सोशल मीडिया टीमकडून माहिती देताना चूक झाली आणि मंदिर डागडुजीसाठी बंद राहणार असल्याची पोस्ट करण्यात आली होती. मात्र नंतर ती माहिती दुरुस्त करण्यात आली.”
त्या पुढे म्हणाल्या, “पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली असावी. बकरी ईद आणि मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही संबंध नाही.” (Pune Saras Baug)
दरम्यान, पुणेकरांनी प्रशासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “सारसबागेत नियमितपणे देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असतात. मग अचानक दोन दिवस संपूर्ण बाग आणि मंदिर बंद करण्याची गरज काय?” असा सवाल अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Pune Saras Baug)
सध्या पोलिसांकडून कोणत्याही संभाव्य सुरक्षेच्या धोक्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सारसबाग परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्यता आहे.





