पुणे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी महापौर मंजूषा नागपूरे यांनी शहरातील विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत महिला पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी तसेच विविध घटकांतील महिलांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौरांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात महिलांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे. नारीशक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांना लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार असून, यामुळे महिलांचा निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग वाढणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणामुळे देशाच्या विकासाला नवे बळ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण, आरोग्य, रोजगार व उद्योजकता या क्षेत्रांमध्ये महिलांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्यास देश अधिक सक्षम आणि समृद्ध बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या नेतृत्व विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असून, पुणे महानगरपालिका महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौरांच्या वतीने नगरसेवक व अधिकारी यांना सुधा मूर्ती लिखित ‘आयुष्याचे धडे गिरवताना’ हे पुस्तक भेट देण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून जीवनमूल्ये, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.