मुंबई – राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बाजूला सारुन अनेकदा राजकीय नेते खासगी कारणांसाठी एकमेकांची सदिच्छा भेट घेताना दिसतात. अशीच एक भेट आज मुंबईमधील दादरमध्ये पार पडली. शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अर्थात ही भेट राजकीय कारणांसाठी नव्हती तर अत्यंत खासगी आणि खास कारणासाठी होती.
संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी “शिवतीर्थ’ला भेटीसाठी गेले होते. ही भेट सुमारे अर्धा तास झाली. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत राज यांच्या घरी गेले होते. या खासगी भेटीनंतर राऊत राज यांच्या घराबाहेर पडले तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना अगदी गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. दक्षिण मुंबईमधील सिलव्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी राऊत यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनाही लग्नाचे आमंत्रण दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी राऊत यांनी राजभवानावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.