लखनौ :- टोमॅटोचे भाव सध्या गगनला भिडले आहेत. त्याचा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यंनी आज अभिनव पद्धतीने निषेध केला. वाराणसीतील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांचा 50 वा वाढदिवस टोमॅटोच्या आकाराचा केक कापून आणि लोकांमध्ये टोमॅटोचे वाटप करून साजरा केला.
या उत्सवाचे आयोजन करणाऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, त्यांनी यानिमीत्त मिठाई वाटली असती पण “मिठाईही महाग झाली आहे. आम्ही आमच्या नेत्याचा वाढदिवस नेहमी थाटामाटात साजरा करतो. पण, यावेळी महागाईने उच्चांक गाठला आहे.
महागाईमुळे आम्ही मिठाई वाटू शकलो नाही. टोमॅटोचा भाव 120 रुपये किलो आहे. आमच्या खेड्यांमध्ये आम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत चपात्या खातो, पण तेही आमच्या ताटातून हिसकावले जात आहे. म्हणून, आम्ही टोमॅटोचे वाटप करत आहोत आणि टोमॅटोसारखा केकही कापत आहोत,असे हा कार्यकर्ता म्हणाला.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही अखिलेश यादव यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत.