जागतिक स्तरावर पुन्हा एकदा स्टार वॉर सुरू करण्याचा प्रयत्न
मॉस्को : गेल्या शतकामध्ये जगामध्ये अमेरिका आणि रशिया याच दोनच महासत्ता होत्या आणि त्यांच्यामध्ये सर्व स्तरांमध्ये स्पर्धा होती. ही स्पर्धा अवकाश मोहिमांमध्ये सुद्धा होती. अवकाश मोहिमांमध्ये रशियाने अमेरिकेच्यावर आघाडी घेतल्यानंतर अमेरिकेनेही चांद्रमोहीम उघडली होती पण आता अमेरिकेची ही चांद्र मोहीम बनावट असल्याचा दावा पुन्हा एकदा रशियाने केला आहे आणि या निमित्ताने जुने स्टार वॉर पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केले आहेत.
रशियाच्या रसकॉसमॉस या अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख डिमिटर रोगोझीन यांनी याबाबत काही विधाने केली असून अमेरिकेच्या निल आमस्ट्राँगने चंद्रावर खरंच पहिले पाऊल टाकले होते का याबाबत मला शंका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या अपोलो 11 या अवकाशयानाच्या मदतीने नील आर्मस्ट्राँगने 1969 मध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याचा इतिहास आहे पण रोगोझीन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अकरा वर्षे संशोधन केल्यानंतरही त्यांना कोठेही या चांद्र मोहिमेचा पुरावा सापडला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची 1969ची चंद्र मोहीम बनावट होती पण त्यानंतरच्या कालावधीत झालेल्या पाच मोहिमा सुद्धा बनावटच होत्या असा दावाही रोगोझीन यांनी केला आहे. अमेरिका आत्ता जे काही करू शकत नाही ते 1969 मध्ये कसे काय करू शकते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आजच्या तुलनेमध्ये अमेरिकेकडे तेव्हा तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते आणि मनुष्यबळही उपलब्ध नव्हते तरीसुद्धा अमेरिकेने चंद्र मोहिमेचा दावा केला हे खोटे आहे असे त्यांनी म्हटले आहे. रोगोझीन यांनी रशियाचे उपपंतप्रधानपदही भूषवले असून ते सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उघडलेल्या युक्रेनविरोधी मोहिमेमध्ये पुतीन यांचे मुख्य सल्लागार आहे.