Rohit Pawar : लाडक्या बहिणी सरकारचा पाणउतारा करतील; रोहित पवारांची खोचक टीका

मुंबई : आपल्या राजकीय स्वार्थापायी आधी बहिणींना लाडके म्हणायचे आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचे हा धंदा सरकारने तत्काळ बंद करावा आणि योजनेच्या लाभाची रक्कम १५०० रुपयांचे २१०० रुपये करण्याचे दिलेले आश्वासन अंमलात आणावे, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला दिला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून नुकतेच राज्य सरकारने योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच, सरकारकडून बोगस लाभार्थ्यांनाही चाळणी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे, यावर पवार यांनी टीका केली आहे.
आणखी एक गौप्यस्फोट करणार
नवी मुंबई विमानतळाजवळील भूखंड घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा सहभाग असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सिडकोवर मोर्चाही काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. याबाबत आणखी एक गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीयातून दिली.





