सहाय्यक पोलीस फौजदार संजय शिरसाट यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक

पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार संजय दामोदर शिरसाट यांना सन २०२५ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (दि. १५ ऑगस्ट २०२५) गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रतिष्ठेचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.
संजय शिरसाट यांनी १९९३ मध्ये पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून प्रवेश केला. त्यानंतर विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. वाहतूक शाखेत कार्यरत असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.व्ही.आय.पी. आणि व्ही.आय.पी. बंदोबस्ताची आखणी आणि अंमलबजावणी यशस्वीपणे केली. गुन्हे शाखेत असताना त्यांनी अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाचे योगदान देत गुन्हे उघडकीस आणले.
सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना बंडगार्डन, भारती विद्यापीठ, हडपसर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांतील गंभीर गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक आणि वेळेत दोषारोपपत्र सादर करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे.
शिरसाट यांना त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात एकूण २९१ बक्षिसे मिळाली असून, यापूर्वी १ मे २०१७ रोजी त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





