राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणणार : शशिकांत शिंदे

कोरेगाव : पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात जातीयवादी पक्षांनी चुकीच्या मार्गाने सरकार आणले आहे. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांविरोधात लढाई सुरू केली आहे, त्याचा प्रारंभ आज या कोरेगाव नगरीतून करत आहे. २०२९ साली राज्यात निश्चितच जातीयवादी सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्यावतीने प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शिवरत्न मंगल कार्यालयात माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार शिंदे बोलत होते.
व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, अजितराव पाटील चिखलीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांनी आपल्याला घडविले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने ताकद दिली आहे. राज्यात जातीयवादी शक्तींनी डोके वर काढले असून लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहून त्यांनी गैरमार्गाने विधानसभा निवडणूक जिंकत सत्ता आणली आहे. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे केले असून शिवसेना देखील फोडली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सोडून अनेक जण गेले.
अनेकांना सत्तेत येण्याचे निमंत्रण सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले, मात्र कोणत्याही परिस्थितीत खासदार शरद पवार यांना न सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी मोठ्या विश्वासाने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांचा मिलाफ करत पक्ष संघटना बळकट करणार आहे. संपूर्ण राज्यात पक्षाची विस्कटलेली घडी बसविणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे पक्षाच्या झेंड्याखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आ. शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांच्या खरपूस भाषेत समाचार घेतला. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी एका बाजूला सोपवली जात असताना कोरेगाव मतदार संघातील विघ्न संतोषी मंडळींनी विनाकारण गैरसमज पसरून कोरेगावात चुकीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. मी विरोधासाठी कधी विरोध केला नाही, मात्र तुमची मानसिकता चुकीची असून तुम्ही चुकीचे काम करत आहात म्हणून विधिमंडळात आवाज उठवला आहे.
जो चुकीचे काम करेल त्याला शिक्षाही होणारच. त्यामुळे तुम्ही विनाकारण कोरेगावकर नागरिकांना भडकविण्याचे काम जरी केले तरी सत्य परिस्थिती जनतेच्या समोर निश्चितपणे आली आहे आणि येणार आहे. घनकचरा प्रकल्प असो, अथवा तीळगंगा नदी प्रकल्प असो विनाकारण जनतेमध्ये गैरसमज पसरून सत्ताधारी चुकीचे काम करत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला.
एकीकडे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठेकेदारांना द्यायला ८९ हजार कोटी रुपये नाहीत आणि दुसरीकडे आपले अपयश लपविण्यासाठी विनाकारण कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत.
मतदारसंघाची पुनर्रचना होणार, प्रदेशाध्यक्ष पद मिळाले, आता तुमचे कसे होणार, तुमचे साहेब जावलीला जाणार नवी मुंबईत जाणार असे कार्यकर्त्यांना बिंबवले जात आहे, मात्र मी आज स्पष्टपणे सांगतो मी कुठेही जाणार नाही. मी कोरेगावकरांचे प्रेम कधी विसरणार नाही आणि मी कोरेगावातच थांबणार आहे, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावून स्पष्टपणे सांगितले.
आ. उत्तमराव जानकर यांनी आ. शशिकांत शिंदे यांना संताजी घोरपडे यांची उपमा दिली असून निश्चितपणे स्वराज्याच्या लढाईत संताजी घोरपडे यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ दिली, त्याप्रमाणे आ. शशिकांत शिंदे हे खासदार शरद पवार यांना साथ देतील आणि राज्यात निश्चितपणे परिवर्तन घडवतील, असा विश्वास व्यक्त केला. आ. बाळासाहेब पाटील यांनी देखील आक्रमकपणे भाषण करत राज्य सरकारवर टीका केली.
प्रारंभी कोरेगाव शहरात आगमन झाल्यानंतर सातारा जकातनाका येथे जेसीबीतून पुष्पवृष्टी करून आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आझाद चौक येथे जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. उघड्या जीपमधून आ. शशिकांत शिंदे, आमदार उत्तमराव जानकर आणि माजी आ. बाळासाहेब पाटील यांची शिवरत्न मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये बीड जिल्ह्यातील भैय्यासाहेब देशमुख, सुनील माने, अजितराव पाटील चिखलीकर, दिनेश बर्गे, सतीश चव्हाण व संजय पिसाळ यांची भाषणे झाली. राजाभाऊ जगदाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कोरेगाव पोलीस रडारवर
प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आ. शशिकांत शिंदे हे भलतेच आक्रमक झाले पहावयास मिळत आहे. केवळ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वत्र शासकीय अधिकारी दबावापोटी पक्षाची नेत्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कसे काम करत आहेत, याची माहिती त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे दिली.
कोरेगावचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे आता आ. शशिकांत शिंदे यांच्या रडारवर आले असून बल्लाळ यांच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कोरेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना दम देत आहेत. मकोका सारखा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत, त्यांचे काय चालले आहे, ते चांगले माहित आहे.





