पुणे – आषाढी एकदशीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच उपवासाला चालणारा साबुदाणा आणि भगरला मागणी वाढली असते. त्यामुळे साबुदाणाच्या भावात घाऊक बाजारात क्विंटलच्या भावात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. तर भगरचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती मार्केटयार्डातील व्यापारी आशिष दुगड यांनी मंगळवारी दिली.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या उपवासाला व्यापारी, छोटे दुकानदार तसेच ग्राहकांकडून साबुदाणा आणि भगरला मागणी वाढत असते. यंदाही मागणी कायम आहे. मात्र, यावेळी पावसाचा फटका साबुदाण्याला बसला आहे. त्यामुळे बाजारात साबुदाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे. भगरीची आवक होत असल्याने भाव स्थिर आहेत. सेलम येथून साबुदाण्याची आवक होत आहे. बाजारात रोज 70 ते 80 टनाची आवक होत आहे. तर भगरीची आवक नाशिक जिल्ह्यातून दररोज 20 ते 30 टनाची होत आहे. विशेष म्हणजे तीन प्रकारच्या दर्जातील साबुदाणा आणि भगर बाजारात उपलब्ध असल्याचेही दुगड यांनी सांगितले.
शेंगदाण्याचे भाव स्थिर
उपवासासाठी शेंगदाण्यालाही मागणी वाढली आहे. मात्र, भाव स्थिर आहेत. बाजारात गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून रोज 50 ते 80 टनाची आवक होत आहे. घाऊक बाजारात घुंगरूचा किलोचा भाव 110 ते 115 रूपये, जाडा 120 ते 130, तर स्पॅनिश 120 ते 125 रूपये असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
साबुदाणा व भगरीचे घाऊक भाव
वस्तू क्विंटलचा भाव
साबुदाणा 1 – 7800 रुपये
साबुदाणा 2 – 7400 रुपये
साबुदाणा 3 – 7000 रूपये
भगर 1 – 10500 रूपये
भगर 2 – 10000रूपये
भगर 3 – 9800 रूपये