मुंबई – खोल समुद्रात सुरू असणाऱ्या जहाजावर सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता शहारूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अखेर चौकशीनंतर आर्यन खान याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालयात नेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना कोर्टात उभं केलं जाणार असल्याचं समजत आहे. आता न्यायालय काय निकाल देत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तत्पूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांमध्ये मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमीत चोप्रा आणि अरबाझ मर्चंट या धनदांडग्यांच्या मुलांचा समावेश आहे.
अंमली पदार्थ कायद्याच्या कलम 67 नुसार या आरोपींचे जबाब घेण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात येईल. या प्रकरणात आर्यनखानचीही चौकशी झाली असून त्याच्यावर अद्याप कोणताही आरोप ठेवण्यात आला नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
रेव्ह पार्टीसाठी शनिवारी सायंकाळी एक जहाज गोव्याकडे शनिवारी रवाना होणार असल्याची खबर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांपूर्वी मिळाली होती. त्या जहाजावर तिकीट खरेदी करून एनसीबीचे अधिकारी प्रवासी म्हणून हजर झाले. जहाजाने जशी मुंबई सोडली तशी जहाजावरील व्यक्तींनी अंमली पदार्थ सेवनास सुरवात केली. त्यावेळी तातडीने कारवाई करत एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
त्यानंतर जहाजाच्या कप्तानाल जहाज बलार्ड पिअर येथील आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रुस टर्मिनलकडे नेण्याचे आदेश देण्यात आले. तेथून त्यांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. त्यांचे सामानही तपासणीसाठी एनसीबी कार्यालयात कडेकोट बंदोबस्तात आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्यांविरोधात पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. ही पार्टी ज्यांनी आयोजित केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची माहिती शिपिंग कॉर्पोरेशन आणि जहाज वाहतूक मंत्रालयाला कळवण्यात येणार असल्याचे एनसीबीच्या महासंचालकांनी सांगितले.
जहाज कंपनीने सहभाग नाकारला
दरम्यान या जहाजाची कंपनी कॉर्डेलिया क्रुझ कंपनीने एका निवेदनाद्वारे या प्रकरणात आपला काही संबंध असल्याचे वृत्त फेटाळले आहे. कॉर्डेलिया क्रुझचा कोणत्याही पध्दतीने, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध नाही. हे जहाज दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिले होते. आम्ही प्रशासनाला पूर्ण पाठींबा आणि सहकार्य करत आहोत, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.