पिंपरी, दि. 22 – भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर देशात हुकूमशाही सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी भाजपाचा पराभवासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
रहाटणी येथे पत्रकार परिषद घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुकुंद रणदिवे, संजय गिरमे, युवराज बनसोडे, सुनील बनसोडे, संदीप रणदिवे, अजय गायकवाड, जयदेव रणदिवे, राजू गायकवाड, संदीप साळुंखे, सचिन सूर्यवंशी, विशाल बेनके, सर्जेराव वाघमारे, सुनील जयस्वाल यांच्याह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आंबेडकर म्हणाले, देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, निवडणूक आयोग, इडी यासारख्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व संपवून हुकूमशाही आणण्याची प्रक्रिया भाजप राबवत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. त्या भूमिकेतून आम्ही काटे यांना पाठिंबा देत आहोत, असे ते म्हणाले. भाजपाच्या संविधानविरोधी भूमिकेला थांबविण्याची सुरुवात चिंचवड मतदारसंघातून होईल. त्यामुळे काटे यांच्या विजयासाठी रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभी राहील, असे आंबेडकर म्हणाले.
यापुढील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसह प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन सेना महाविकास आघाडीच्या सोबत असेल व प्रत्येक ठिकाणी भाजपचा पराभव होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पाठींब्याचे लेखी पत्र नाना काटे यांच्याकडे सुपुर्द केले.