लोणी काळभोर, (वार्ताहर)- येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवा निमित्त 15 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता घटस्थापना होणार असून आगामी दहा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.
श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला (हनुमान जयंती) असते. यंदा हि यात्रा दि. 23 व 24 एप्रिल रोजी आहे. 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या वार्षिक यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. सायंकाळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
15 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता श्रींचा महामस्तकाभिषेक होणार आहे. चैत्र नवरात्रातील घटस्थापन सायंकाळी सहा वाजता होणार आहे. रामनवमी निमित्त राम मंदिरात सकाळी 10 ते 12 हभप दत्तात्रय महाराज काळभोर यांचे कीर्तन होणार आहे.
19 एप्रिल रोजी पाचव्या माळेनिमित्त सुवासिनींनी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. 23 एप्रिलला महापुजा पहाटे चार वाजता होईल.
प्राचीन ग्रामदैवत अंबरनाथ मंदिरापासून सुरु झालेला पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरू होईल. 24 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला आहे. 25 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता वरात काढण्यात येणार आहे. 25 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत मारुती मंदिरा जवळ, पहाटे 4 ते 5 या वेळेत जुन्या अंबरनाथ मंदिराजवळ संत एकनाथांचे भराड ( कथा ) सादर होणार आहे. दरम्यान 15 ते 22 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.