नगर – शिधापत्रिकांची छपाईच ठप्प झाल्याने संपूर्ण राज्यात गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शिधापत्रिकांची टंचाई निर्माण झाली आहे. शिधापत्रिका मिळत नसल्याने लाभार्थी आज धान्यापासून वंचित आहेत. मात्र पुरवठा अधिकारी हेमलता बडे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून खास नगर जिल्ह्याला आठ महिन्यानंतर शिधापत्रिका उपलब्ध केल्या आहेत. सुमारे 35 हजार शिधापत्रिका उपलब्ध झाल्या असून 10 हजार लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आहे.
संपूर्ण राज्यात शिधापत्रिकांचा अजूनही तुटवडा आहे. मात्र नगर जिल्ह्यात शिधापत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. शिधापत्रिकांसाठी नोंदणी करणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळत नव्हत्या. शिधापत्रिकांची छपाईच बंद असल्याने केशरी व पिवळी शिधापत्रिका मिळत नव्हती. याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. मात्र नगर जिल्ह्यात नुकतेच या शिधापत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. आता त्याचे वाटप देखील सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या पिवळी शिधात्रिकाधारक 87 हजार 868, केशरीधारक 9 लाख 63 हजार 471 तर पांढरी शिधापत्रिकाधारक 58 हजार 268 आहेत. सध्या असलेले स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने तब्बल 164 स्वस्त धान्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून त्यात ग्रामीण भागात 147 तर शहर भागात 17 दुकाने नव्याने सुरू होणार आहेत. त्यात अकोले-37, संगमनेर- 35, राहाता- 9, कोपरगाव- 5, श्रीरामपूर- 9, राहुरी- 13, नेवासा- 8, नगर – 4, पाथर्डी – 6, श्रीगोंदा- 12, पारनेर- 17, कर्जत- 5, नगर शहर 4. या प्रमाणे नव्याने दुकानाचे प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. महिला बचत गट, विविध कार्यकारी सेवा संस्था यांना ही दुकाने चालविता येणार आहे.