संगमनेर – “माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत एका व्यक्तीने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे. नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्टर मित्र असून त्यांच्याकडे रुग्णालयात नोकरीला लावतो, असे सांगून तिला संगमनेरच्या बस स्टॅंडवर बोलावून घेतले होते. नोकरीच्या आशेने पीडित महिला बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संगमनेरमध्ये आली.
तेथे आरोपीसोबत तिची भेट झाली असता आरोपीने बस स्थानकावरील चहाच्या दुकानासमोर या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आजूबाजूच्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आरोपीला पकडून ठेवले. महिलेने घटनेची माहिती 112 क्रमांकावर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.