TNPL 2025 : अश्विनवर बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप, TNPL मध्ये खळबळ!

TNPL 2025 R Ashwin Faces Ball Tampering Allegations : तमिलनाडु प्रीमियर लीग (TNPL) 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १४ जून रोजी सालेम येथील एससीएप क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या डिंडीगुल ड्रॅगन्स आणि सिकेम मदुरै पँथर्स यांच्यातील सामन्यात अश्विनच्या संघावर बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
मदुरै पँथर्सने दावा केला आहे की, ड्रॅगन्सने रासायनिक पदार्थांनी उपचारित टॉवेलचा वापर करून चेंडूच्या स्थितीत छेडछाड केली. या सामन्यात ड्रॅगन्सने पँथर्सचा ९ गडी राखून दारुण पराभव केला होता, ज्यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला. मदुरै पँथर्सचे सीईओ महेश एस यांनी टीएनपीएल आयोजकांना पत्र लिहून टॉवेलच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केली.
मदुरै पँथर्सचे सीईओ काय म्हणाला?
1️⃣0️⃣0️⃣-run partnership between Ravi Ashwin and Baba Indrajith. 🔥#DDvCSG #TNPL #TNPL2025 #NammaOoruNammaGethu pic.twitter.com/VdDCQS0KKH
— TNPL (@TNPremierLeague) June 16, 2025
मदुरै पँथर्सचे सीईओच्या म्हणण्यानुसार, ड्रॅगन्सने वारंवार इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत चेंडूशी छेडछाड केली, ज्यामुळे चेंडूला धातूसारखा आवाज येत होता. मात्र, टीएनपीएलचे सीईओ प्रसन्ना कन्नन यांनी या आरोपांना अटकळबाजी ठरवत, ठोस पुरावे सादर करण्याचे निर्देश पँथर्सला दिले. कन्नन यांनी स्पष्ट केले की, टॉवेल तमिलनाडु क्रिकेट असोसिएशनने पुरवले होते आणि ते दोन्ही संघांना एकसमान उपलब्ध होते. तसेच सामन्यादरम्यान अंपायर आणि सामना रेफ्री यांनी कोणतीही अनियमितता नोंदवली नव्हती.
हेही वाचा – Shardul Thakur : शार्दुल ठाकूरचं धमाकेदार शतक, इंग्लंड दौऱ्यापूर्वी ठोकला कसोटी संघात दावा
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रत्येक फ्रँचायझीला टॉवेल पुरवते –
ही स्पर्धा पावसाळ्यात होत असल्याने डिंडीगुल ड्रॅगन्स आणि सिकेम मदुरै पँथर्स सामन्याला पावसामुळे विलंब झाला होता. ओल्या आऊटफिल्डच्या परिस्थितीत, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रत्येक फ्रँचायझीला टॉवेल पुरवते, ज्याचा वापर खेळाडूंना केवळ पंचांसमोर चेंडू सुकवण्यासाठी करता येतो. कन्नन म्हणाले, “संघांना फक्त टीएनपीएलने दिलेल्या टॉवेलचाच वापर करून चेंडू सुकवावा लागतो. षटकार, आऊट किंवा ओव्हर-ब्रेकनंतर चेंडू नियमितपणे पंच तपासतात आणि सामन्यादरम्यान चेंडूमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही.”
हेही वाचा – WMPL 2025 : पुणे वॉरियर्सचा थरारक विजय! सोलापूरवर १ धावेने मात करत पटकावलं पहिलं विजेतेपद
स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याची शक्यता –
या प्रकरणात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याची शक्यता आहे, जर पुरावे सापडले तर कठोर कारवाई होऊ शकते. दुसरीकडे, जर आरोप खोटे ठरले, तर पँथर्सवर कारवाई होऊ शकते. यापूर्वीही अश्विनवर अंपायरशी वाद आणि उपकरणांच्या गैरवापराबद्दल ३०% मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला होता. या घटनेने अश्विनच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली आहे.





