Pune Weather: पुणेकरांची उकाड्याने लाहीलाही! जून उलटला तरी पारा ३७ अंशांवर; कधी बरसणार पावसाच्या सरी?
Pune Weather: जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी मान्सूनची हुलकावणी; शहरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण.

Pune Weather – पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना मागील दोन ते तीन दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. शहरासह उपनगरात कमाल तापमान ३७ अंशापर्यंत गेल्याने उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करीत असून, वातावरणातील उकाडाही पुणेकरांना हैराण करीत आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत शहरासह जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा चटका कायम राहणार असून, दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा उजाडला तरी उन्हाचा कडाका कायम असल्याने शहरातील कमाल तापमान तब्बल ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर पाषाण, मगरपट्टा, कोरेगाव पार्क, दापोडी आणि शिवाजीनगर परिसरातील उष्णतेचा पारा ३६ अंशाच्या पुढे नोंदविला आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आणि मान्सूनची गती काहीशी मंदावल्याने जूनच्या सुरुवातीलाच पुणेकरांना मे महिन्यासारख्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
उकाडाही वाढला असून, रात्री काही उपनगर परिसरात हवेतील गारव्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरावरील आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता आणखी काही काळ जाणवत राहील. पुढील २४ तासात पुणे शहरासह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या हलक्या सरी काहीसा दिलासा देण्याची शक्यता आहे. तर वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.





