Indapur Temperature – तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून उन्हाचा कडाका आणि तीव्र उकाड्याचा प्रकोप कायम असून, रविवारीही (दि. २४) नागरिकांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागला. यंदा तापमानाने ४२ ते ४३ अंश सेल्सिअसचा पारा ओलांडल्याने शेतकरी, शेतमजूर आणि बालकांसह सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता असह्य झाली आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या त्रासामुळे शेतमजूरही दुपारच्या सत्रात शेतातील कामे थांबवून विश्रांती घेण्यास प्राधान्य देत आहेत. या तीव्र उन्हाचा ऊस पिकासह अन्य पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पिकांसोबतच जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. सध्याच्या कडक उन्हामुळे नागरिकांमध्ये अशक्तपणा येणे, चिडचिड होणे यांसारखा त्रास जाणवत असून उष्माघाताची लक्षणेही दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, “नागरिकांनी व विशेषतः बालकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि सायंकाळच्या वेळीच बाहेर पडावे,” असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. दरम्यान, मे महिन्याच्या अखेरपर्यंत उष्णतेची ही लाट अशीच कायम राहण्याची शक्यता हवामान क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.