पुणे – महापालिकेला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे दर नव्याने निश्चित झाल्यानंतर या दराच्या पाचपट शुल्क व्यापारी संस्था, विशेष नागरी वसाहती यांच्याकडून आकारावे असेही जलदर वाढीच्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे मॉल आणि मोठ्या वसाहती यांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत मोठी वाढ होणार आहे.
घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जून 2023 पर्यंतचे दर जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये महापालिकेला आकारण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात पाच पटीने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापारी संस्था अथवा विशेष नगर वसाहती यांच्याकडून आकारवयाचे शुल्कदेखील जलसंपदा विभागाकडून निश्चित करून देण्यात आले आहे.
त्यामध्ये जर व्यापारी संस्था अथवा विशेष नगर वसाहत यांचे काम सुरू असेल, तर त्यांना औद्योगिक दराने पाणी पूरवठा करावा. काम पूर्ण झाले, पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर जलसंपदा विभागाकडून महापालिकांना ज्या दराने पाणी पुरवते. त्या दराच्या पाचपट दराने शुल्क आकरावी करावी, असेही प्रस्तावित करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत पुणे शहरात सध्या औद्योगिक संस्था, व्यापारी संकुले यांना आठ रुपये प्रतिहजार लिटर या दराने पाणीपुरवठा होतो. जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेली वाढ जर मान्य झाली. त्या दराच्या पाचपट दराने त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करावी लागणार आहे.