Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! आठवड्यात १ दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…वाचा सविस्तर
Pune Water Cut: राज्य शासनाकडून १० टक्के पाणीकपातीचे निर्देश मिळताच पुणे महापालिकेकडून नियोजन सुरू; उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून खबरदारीचे पाऊल.

Pune Water Cut- अल् निनोच्या संकटामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा जुलै २०२७ पर्यंत राखीव ठेवण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी, शहरी आणि ग्रामीण भागात १० टक्के पाणीकपात करण्याबाबत मंत्रीमंडळ उपसमिती मध्ये चर्चा करण्यात आली आहे.
ही बाब लक्षात घेवून महापालिका प्रशासनाकडूनही गरज पडल्यास आठवडयात एक दिवस संपूर्ण शहराचे पाणी बंद ठेवण्याचे नियोजन सुरू केले आहे. या पूर्वी महापालिकेने २०२१ च्या पाणीसंकटाच्या काळातही अशाच प्रकारे नियोजन केले होते. त्याच धर्तीवर हे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
राज्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणातील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सध्या धरणात १ टीएमसी पाणी कमी असले तरी आता पासूनच जलसंपदा विभाग आणि महापालिकेकडून पाण्याचे नियोजन केल्यास हा पाणीसाठा जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा आहे.
तर मागील वर्षी धरणे भरूनही पाण्याचे नियोजन न झाल्याने शहरावर दिवसाआड पाणी कपातीची वेळ आली होती. मात्र, आता पासूनच पालिकेने प्रत्येक आठवडयात एक दिवस पाणीकपात केल्यास उन्हाळयात पुणेकरांना पुरेसे पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून पाण्याबाबत निर्णय घेण्यास सुरूवात करण्यात आलेली असतानाच पालिकेनेही १० टक्के पाणीकपातीचे नियोजन सुरू केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“राज्यशासनाकडून पाण्याचा आढावा घेतला जात आहे.धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत महापालिकेकडून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे १० टक्के पाणीकपातीबाबत निर्णय झाल्यास, तशी महापालिकेची तयारी आहे. या आधीही २०२०-२१ मध्ये संपूर्ण वर्षभर दर आठवड्याला एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आले होते.आता पासूनच कपात केल्यास महापालिका वर्षाला १४ टक्के पाणी वाचवेल. त्यामुळे उन्हाळयात शहराला दिलासा मिळेल.”
– नंदकिशोर जगताप ( पाणीपुरवठा विभाग)






