Junnar News: ‘शाळा आमच्या नशिबातच नाही…’; ७ वर्षांच्या चिमुरडीच्या कसरतीवर चालतो संपूर्ण कुटुंबाचा संसार
Junnar News: एक जुनी दुचाकी, बांबू आणि गोधड्या एवढाच संसार; शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या भटक्या कुटुंबांपर्यंत योजनांचा लाभ कधी पोहोचणार?

– रामदास सांगळे
Junnar News- एका हातात पुस्तक, पाठीवर दप्तर आणि डोळ्यांत भविष्याची स्वप्ने घेऊन शाळेत जाण्याच्या वयात सात वर्षांची गंगोत्री नाट मात्र हातात दोरीचा तोल सांभाळत आहे. स्वतःच्या जीवाची बाजी लावत ती दोरीवर कसरती करून मिळणार्या तुटपुंज्या कमाईतून आई-वडील आणि लहान बहिणीच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहे. तिच्या या कसरतीमागे केवळ डोंबारी कलेची परंपरा नाही,
तर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालपणाची आणि पोटासाठी सुरू असलेल्या संघर्षाची कहाणी आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर येथील नाट कुटुंब गेल्या काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते महाराष्ट्रात असून, जुन्नर तालुक्यातील बेल्हे, राजुरी, आळेफाटा आणि परिसरात त्यांनी मुक्काम केला आहे.
आठवडे बाजाराच्या दिवशी कसरतीचे खेळ सादर करून अधिक उत्पन्न मिळेल, या आशेने त्यांनी बेल्हे येथे मुक्काम केला आहे. रस्त्याच्या कडेला सहा बांबू उभे करून त्यावर सुमारे वीस फूट लांबीची दोरी बांधली जाते. जमिनीपासून सुमारे दहा फूट उंचीवर असलेल्या या दोरीवर गंगोत्री कधी अनवाणी, कधी चपला घालून, तर कधी स्टीलच्या ताटावर उभी राहून तोल सांभाळते.
डोक्यावर एकावर एक तीन भांडी ठेवून ती दोरीवरून चालत कसरती सादर करते. उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविणार्या या खेळानंतर मिळणार्या पैशातूनच कुटुंबाचा संसार चालतो. या कुटुंबाचा संसारही तितकाच हलाखीचा आहे. एक जुनी दुचाकी, रिक्षा, काही बांबू, दोरी आणि चार-सहा गोधड्या एवढाच त्यांचा संसार. मुक्कामासाठी ना घर, ना निश्चित ठिकाण; वर आभाळ आणि खाली धरती, अशा परिस्थितीत हे कुटुंब गावोगाव भटकत आहे.
अशा कुटुंबांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि शासनाच्या योजनांचा लाभ कधी आणि कसा पोहोचणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. गंगोत्रीच्या कसरतीच्या खेळावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे शाळेत जाणे हा प्रकार आमच्या आयुष्यात आलाच नाही. असेच गावोगाव फिरत कसरतीचे खेळ करत राहतो आणि वर्षातून एखाद्या वेळी गावाकडे जातो, असे गंगोत्रीच्या कुटुंबीयांनी सांगितले.
डोंबारी कला म्हणजे काय?
डोंबारी ही पारंपरिक लोककला असून, दोरीवरील कसरती, उंचावर तोल सांभाळणे, विविध शारीरिक कसरती आणि खेळ सादर करून लोकांचे मनोरंजन केले जाते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही कला आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे हळूहळू लोप पावत आहे.
“डोंबारी खेळ ही आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली पारंपरिक कला आहे. आजच्या आधुनिक युगात या कलेला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. तरीही आमची कला आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोरीवरील कसरती सादर करत आहोत. लोकांनी या कलेला प्रोत्साहन द्यावे आणि आमच्या कलेची दखल घ्यावी, हीच अपेक्षा आहे.”
– सोनू नाट, गंगोत्रीचे वडील






