Shirur Accident: शिरूरमध्ये भरधाव कारची धडक! एकाचा करुण अंत, एकजण गंभीर; चालक फरार
Shirur Accident: मलठण-कवठे येमाई अष्टविनायक मार्गावर मुंजाळवाडीतील जिल्हा परिषद शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात.

Shirur Accident- मलठण- कवठे येमाई अष्टविनायक मार्गावर मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २९) सायंकाळी घडली. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला आहे.
संतोष शंकर मुंजाळ, असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर सबाजी भागा मुंजाळ (वय ३८) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनासह पलायन केलेल्या चालकाचा कसून तपास सुरू आहे. मुंजाळवाडी हद्दीत शाळेजवळ स्विफ्ट ही कार भरधाव वेगाने येत होती. कारचालक वैभव ढोमे (रा. पिंपरखेड, ता. शिरूर) याने स्पीडब्रेकरजवळ वाहनाचा वेग कमी न करता निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले संतोष मुंजाळ, सबाजी मुंजाळ यांना कारने जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर चालकाने जखमींची मदत करण्याऐवजी अपघाताची खबर न देता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, मुंजाळ यांचा उपचारापूर्वीच अथवा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पांडुरंग मुंजाळ (वय ४९, रा. मुंजाळवाडी, कवठे येमाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत.




