Bhor News: भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला वेग! ४५ गावांमध्ये घरोघरी जाऊन सहवासितांचे सर्वेक्षण
Bhor News: आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविकांकडून ४५ गावांत घरोघरी भेट; कुष्ठरुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू.

Bhor News- फोकस्ड लेप्रसी सर्वेक्षण (FLC) तसेच कुष्ठरोग सहवासितांच्या सर्वेक्षणांतर्गत भोर तालुक्यात १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मागील पाच वर्षांतील कुष्ठरोग रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यावर मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे.
भोरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या सूचनेनुसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथील डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. पद्मवीर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ९ उपकेंद्रे आणि ४५ गावांमध्ये आरोग्य विभागाचे पथक घरोघरी भेट देऊन कुष्ठरोग सहवासितांची तपासणी करीत आहे.
आरोग्य सहाय्यक विजय पावरा व किशोर काळोखे यांच्या समन्वयातून तसेच आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांच्या सहकार्याने सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. हातवे बु., कापूरहोळ, कासुर्डी गुं. मा., शिवरे, केळवडे, वेळू, जांभळी, नसरापूर आणि देगाव आदी गावांमध्ये संबंधित आरोग्य सेवक कर्मचारी व आशा स्वयंसेविका नागरिकांपर्यंत पोहोचून तपासणी करीत आहेत.
अधिकाऱ्यांकडून मोहिमेची पाहणी
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी सहाय्यक संचालक कुष्ठरोग जयश्री साळुंखे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयंत काळकुटे, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक राहुल तुळसे व सुनील तांबट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूरला भेट देऊन सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाची माहिती घेतली तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला.
यानंतर अधिकाऱ्यांनी कासुर्डी गुं. मा. आणि चेलाडी येथील कातकरी वस्तीला भेट देऊन संशयितांची तपासणी केली. दुर्गम वस्तीतील नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचून संशयित रुग्णांचा शोध घेण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सहवासितांची तपासणी, संशयित रुग्णांचा शोध आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय कार्यवाही केली जाणार आहे.





