PMC News: महापालिका तूर्तास ‘राम’भरोसे! आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अन् शहर अभियंता सगळेच परदेश दौऱ्यावर
PMC News: विधान परिषदेची आचारसंहिता लागू असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती; आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेची कसोटी.

PMC News- तब्बल ४५ लाखांहून अधिक लोकसंख्या, राज्यातील सर्वाधिक ५१८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, तब्बल १५ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेचा कारभार आता पुढील काही दिवस ‘राम’भरोसे असणार आहे. महापालिकेतील सर्वच वरिष्ठ अधिकारी पुढील काही दिवस परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने शहराचा कारभार सांभाळणार कोण, असे चित्र निर्माण झाले आहे.
कोण कुठल्या दौऱ्यावर..!
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आहेत, तर अतिरिक्त आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे, प्रजीत नायर, तसेच पवनीत कौर यांच्याकडे पदभार आहे. यातील अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे १२ ऑक्टोबरपर्यंत रजेवर आहेत. प्रजीत नायर हे २७ सप्टेंबर रोजीच जपान दौऱ्यावर गेले असून, ते ५ ऑक्टोबर रोजी परत येणार आहेत.
महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कौर हे ५ ऑक्टोबरपासून जर्मनी दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी आहे. उद्या (गुरुवारी) १ ऑक्टोबर रोजी कौर या मुंबईत बैठकीसाठी जाणार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त वगळता कोणीही वरिष्ठ अधिकारी असणार नाही.
दौऱ्यांच्या तारखांचे नियोजन आणि पदभार कागदोपत्री असून, या कालावधीत शहरात काही मोठी दुर्घटना अथवा घटना घडल्यास कोणीही वरिष्ठ अधिकारी असणार नाही. परिणामी, पुढील काही दिवस पुणेकरांसाठी परीक्षेचे ठरणार आहेत.
शहर अभियंताही दौऱ्यावर
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त परदेश दौऱ्यावर असताना प्रशासकीय कामाची जबाबदारी अनेकदा शहर अभियंत्यांकडे असते. कोणत्याही अडचणीच्या काळात त्यांच्याकडून नियोजन केले जाते. मात्र, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हेदेखील अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्यासोबत जपान दौऱ्यावर असून, ते ५ ऑक्टोबरपासून रुजू होणार आहेत.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आयुक्तांनी त्याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढून नवीन कामे, निविदा आणि निधीतील कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अशा संवेदनशील प्रशासकीय कालावधीतच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती राहणार असल्याने निर्णयप्रक्रिया आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे.





