पुणे – पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी महेंद्र के. महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याने महिनाभरापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्याकडे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात पुण्यासह राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश, वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आणि कौटुंबिक न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश काढला. त्यामध्ये पुण्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी मुंबई येथील धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. मात्र, या आदेशाला महिना उलटला तरी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदाची सूत्रे महाजन यांनी स्वीकारली नसल्याचे न्यायालयातील सूत्रांनी सांगितले.
पुणे जिल्हा व सत्र न्यायालय हे राज्यातील महत्त्वाचे न्यायालय आहे. या न्यायालयाची हद्द मोठी असून, त्यामध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्याही अधिक आहे. न्यायालयाच्या व्यवस्थापनात प्रमुख जिल्हा न्यायाधीश अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या पुण्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशाचा प्रभार जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्याकडे आहे. न्यायालयात पार्किंगची अनुपलब्धता, वकील व पक्षकारांसाठी अपुरे कँटीन आदी असुविधांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर न्यायालयावरील खटल्यांचा ताण मोठा आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ प्रमुख जिल्हा न्यायाधीश असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया वकील वर्गातून व्यक्त होत आहे.
” पुणे जिल्हा व सत्र न्यायालयावर कामाचा ताण खूप आहे. या ठिकाणी प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी असून, वकील व पक्षकारांना विविध समस्याही भेडसावत आहेत. त्यामुळे पुणे न्यायालयात पूर्णवेळ प्रमुख जिल्हा न्यायाधीश असणे आवश्यक आहे.” – ॲड. केतन कोठावळे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन