पुणे – विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत बुधवारी टिळक रस्त्त्यावर एम.पी.एस.सी. चे विदयार्थी हे अभ्यास करून त्यांचे रूमवर जात असताना काही अज्ञात गुन्हेगारांनी त्यांना अडवून कोयत्याने मारहाण करत पळ काढला होता. या आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक केली.
आदित्य ऊर्फ आदि जीवन गायकवाड ( वय 21 ), साहिल ऊर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे (वय 23 ), अनिकेत ऊर्फ ऍन्डी संग्राम सरोदे (वय 23, सर्व रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
विद्यार्थ्यांनी तक्रार करताच विश्रामबाग पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना खबर मिळाली की, आरोपी हे पानमळा वसाहत, सिंहगड रोड येथील आहेत. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन तपास पथकासह आरोपींकडे धाव घेतली.
आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. यानंतर त्यांना अटक करण्यात आले. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उप-निरीक्षक वर्षाराणी सुतार करीत आहेत.
ही कारवाई उपायुक्त संदिपसिंह गिल्ल सहाय्यक आयुक्त वसंत कुंवर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक निरीक्षक बाळकृष्ण नानेकर, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, मयूर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खरात यांच्या पथकाने केली.