सात ते आठ वाहनांना धडक; दोन अल्पवयीन मुले ताब्यात
पुणे – धनकवडी परिसरात शुक्रवारी दुपारी “हिट ऍन्ड रन’ची घटना घडली. अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या कारने सात ते आठ वाहनांना धडक दिली. यामध्ये सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. नागरिकांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या साथीदारास पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले.
सहकारनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालाजीनगर येथील गाडी मालक (आय टेन कार) विनय जर्नादन नायर (वय 25) यांच्याकडील 19 वर्षीय शिक्षकाच्या भावाने (वय 14) नायर यांची कार घेतली, सोबत त्याचा वर्गमित्राला घेतले. यानंतर दोघे भारती विद्यापीठ मागील आंबेगाव पठार येथून निघाले असता त्यांच्या कारची एका वाहनाला धडक बसली.
तो वाहन चालक त्यांच्या मागे लागला. याप्रकरणामुळे घाबरुन अल्पवयीन चालकाने भारती विद्यापीठ, धनकवडी आणि बालाजीनगर मार्गे वेगाने कार घेऊन पळू लागले. त्याचवेळी त्यांनी रस्त्यातील सात ते आठ वाहनांना ठोकरले. यामध्ये रिक्षातील ज्येष्ठ महिलेच्या हाताला लागले तर पायी जाणारे दोघे बचावले.
काही वाहनचालकांनी त्यांचा पाठलाग करुन बालाजीनगर येथे गाठले. त्यांची गाडी अडवून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघांच्याही पालकांना आणि वाहन मालकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.