पुणे – शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी (दि. १४) रात्री नवी मुंबई परिसरात कारवाई केली. मुळशीतील गुंड विठ्ठल शेलारसह रामदास मारणे (वय ३६,रा.मुळशी), मोहन पांगारे (वय ३४,रा.मुळशी) याला अटक केली. तर, मुळशी परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले.
विठ्ठल शेलार हा मास्टरमाईंड असल्याचे त्याला अटक होइपर्यंत वाटत होते. मात्र, अटकेनंतर मास्टरमाईंड वेगळाच असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या खून प्रकरणात गुंड गणेश मारणे याचाही शोध गुन्हे शाखा घेत आहेत. मात्र, तो परागंदा झाला आहे. मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल शेलारसह आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. दि. ५ जानेवारीला कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला होता.
मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता. खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आलेली आहे. तपास सुरू असताना पोलीस मुख्य सूत्रधाराचा शाेध घेत होते. मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने शेलार, मारणे यांच्यासह तीन जणांना नवी मुंबईतून तर मुळशी तालुक्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. विठ्ठल शेलार याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. तो एका राजकीय पक्षाच्या युवा मोर्चाचा तालुका अध्यक्षही होता.
…अशी दिली गेली शरद मोहोळच्या खूनाची सुपारी
विठ्ठल शेलार हा गणेश मारणेचा सहकारी आहे. तर, गोळीबार करणारा मुन्नाचा मामा कानगुडे हा शेलारचा नंबरकारी आहे. शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांची वर्षभरापूर्वी एका हॉटेलमध्ये वादावादी झाली होती. तर वेगरे गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी कानगुडेने मोहोळला मदत मागीतली होती. मात्र, मोहोळने त्याला धुडकावले. यानंतर कानगुडे विठ्ठल शेलारकडे मदतीसाठी गेला.
विठ्ठल शेलारने त्याला मदत केली. या मदतीमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कानगुडेने विजय मिळवला. त्याला अडीच वर्षे सरपंचपद मिळाले. यानंतर शेलारने कानगुडेला मदतीची परतफेड म्हणून शरद मोहोळच्या खूनाची सुपारी दिली. कानगुडेनेही तयारी दर्शवत भाचा मुन्नाच्या मदतीने मोहोळचा गेम केला. सध्या पोलिसांचा तपास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
पडद्यामागे दुसरेच कोणी ?
तपासाची दिशा गणेश मारणेपर्यंत पोहोचली आहे, त्याला तपासाला बोलवताच तो पसार झाला. मोहोळच्या पत्नीनेही मारणेवर संशय व्यक्त करुन गुन्हे शाखेला एक पत्र दिले आहे. पोलिसांनाही प्राथमिक तपासात मारणेचा सहभाग दिसत आहे. मात्र, गणेश मारणे मागेही दुसराच कोणी सुत्रधार असण्याची शक्यता आहे. मात्र, मारणेच्या चौकशीत पुढील दिशा ठरेल. एकंदर या प्रकरणाला थोडे राजकीय वळण लागल्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.