पुणे – मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार असून येत्या मंगळवारपासून (दि.२३) प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामीण भागात मिळून एकूण 6 हजार 400 प्रगणकांमार्फत सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी सुमारे 6 हजार 400 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. एका प्रग़णकांना सुमारे 100 ते 150 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका स्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती केली आहे.
गोखले इन्स्टिट्यूटतर्फे प्रश्नावली तयार करून ती जिल्ह्यांना देण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम करणारे कर्मचारी अर्थात प्रगणक यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात येत आहेत.