पुणे – लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले आहे. त्यांचे प्रशिक्षण योग्यरितीने करण्यात यावे. मतदार यादीशी संबंधित कामे वेळेवर करण्यात यावी. नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी निवडणूक समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. बैठकीस बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला (दूरदृष्यप्रणालीद्वारे) निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले की, मतदान, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्तीच्यादृष्टीने विविध पैलुंचा समावेश दळणवळण आराखड्यात करावा, जेणेकरून प्रत्येक काम वेगाने पूर्ण होईल. ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या मतदानासाठीच्या व्यवस्थेचाही या आराखड्यात विचार करावा.
मतमोजणी केंद्राचा आराखडा, सुरक्षा व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांचे मतदान, मतदान साहित्य वितरण, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रातील सुविधा, टपाली मतदान, सी-व्हिजील ॲपवरील तक्रारी, निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदी विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.