पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शिवाजीनगर न्यायालय-ते लोणीकाळभोर या 19 किलोमीटर लांबीचा, तसेच हडपसर ते सासवड पाच किलोमीटर आणि स्वारगेट- पूलगेट हा तीन किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रो मार्गांचे काम खासगी भागीदार तत्वावर किंवा ठेकेदार कंपनीकडून काम करून त्यांना पैसे देणे या तत्वावर करावे, या संदर्भातील प्रस्ताव लवकरच राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
“पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीनगरहून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर- हडपसर -फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी “शिवाजीनगर ते लोणीकाळभोरपर्यंत मेट्रो मार्ग दाखविण्यात यावा,’ अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर दिल्ली मेट्रोने पीएमआरडीएला मध्यंतरी प्रारूप अहवाल सादर केला होता. त्यामध्ये भविष्यातील पुरंदर विमानतळाचा विचार करून शिवाजीनगर ते सासवड हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यामध्ये पीएमआरडीएने काही बदल सुचवत नव्याने स्वारगेट ते पुलगेट आणि गाडीतळ ते लोणीकाळभोर मार्गांचा समावेश करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्ली मेट्रोला केल्या होत्या. त्यानुसार दिल्ली मेट्रोकडून सुधारीत अंतिम अहवाल पीएमआरडीएला सादर केला आहे. या मार्गांचे काम खासगी भागीदारी तत्वावर हाती घेण्यात यावे, की ठेकेदार नेमून काम करून घ्यावे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी
राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.