पिंपरी – पिंपरी येथील नगर भूमापन कार्यालय अंतर्गत शहरातील 90 हजार 332 मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाइन झाल्या आहेत. तर, 613 फेरफार घेण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यालयाचा कारभार “पेपरलेस’ होण्यास मदत होत आहे.
शहर सर्वेक्षण (सिटी सर्व्हे) झाल्यापासून मिळकत पत्रिका हस्तलिखित स्वरुपात दिले जात होते. हस्तलिखित स्वरुपातील या मिळकत पत्रिकांची वारंवार हाताळणी होत होती. त्यामुळे त्या जीर्ण झाल्या होत्या. त्यावरील जुन्या नोंदी स्पष्ट दिसण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मिळकत पत्रिका डिजिटल स्वरुपात करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी कार्ड इन्फार्मेशन सिस्टिम (ईपीक्स) हा प्रकल्प 2018 पासून हाती घेण्यात आला. सध्या या प्रकल्पातंर्गत सर्वच डाटा डिजिटल स्वरुपात साठविला जात आहे. त्यामध्ये भूमी अभिलेख विभाग आघाडीवर आहे. महसूल विभागाचे सातबारावरील फेरफार ज्याप्रमाणे ऑनलाइन होत आहेत. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख विभागाची ईपीक्स प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे महसुलाचा पाया असणारे तीनही विभाग (महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालय) एकमेकांशी जोडले गेले आहेत.
सर्वच कार्यालयातील मिळकत पत्रिका डिजिटल स्वरुपात उपलब्ध करण्याचे काम ऑगस्ट 2018 पासून सुरू झाले. पूर्णपणे डाटा अद्ययावत होऊन ऑनलाइन फेरफार घेण्याचे काम एप्रिल 2021 पासुन सुरू झाले. पिंपरीतील नगर भूमापन कार्यालयातील 90 हजार 332 मिळकत पत्रिका या डिजिटल स्वरुपात फेरफारसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाइन माध्यमाशिवाय हस्तलिखित स्वरुपात एकही फेरफार सध्या घेण्यात येत नाही. मिळकत पत्रिकेचा डाटा नोंदणी विभागास जोडला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त झाल्यावर त्वरीत ईपीक्स आज्ञावलीत त्या दस्ताची माहिती इंडेक्स-2, दस्त हस्तांतर होऊन पुढे फेरफार घेण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात अर्ज करण्याची गरज नाही.
613 फेरफार झाले ऑनलाइन
नगरभूमापन कार्यालयाकडे ऑनलाइन म्युटेशनद्वारे 613 फेरफार घेण्यात आले आहे. तसेच, ऍटो ट्रीगर म्युटेशनद्वारे 45 दस्त म्युटेशनसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. डिजिटल स्वरुपात उपलब्ध झालेल्या मिळकतपत्रिका या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती नगरभूमापन अधिकारी उमेश झेंडे यांनी दिली.