पुणे : सिव्हिल कोर्ट येथून सकाळी ११ वाजता मेट्रोने पिंपरी-चिंचवडकडे निघालेल्या प्रवाशांना शिवाजीनगर स्थानकातच उतविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. हे प्रवासी बसलेली मेट्रो ट्रेन डेपोमध्ये जाणार असल्याने ती प्रवाशी संचलनासाठी नाही, असे सांगत मध्येच प्रवाशांना मेट्रोतून उतरविण्यात आल्याने प्रवाशांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मेट्रो डेपोत जाणार होती, तर आधीच सिव्हिल कोर्ट स्थानकावर घोषणा का केली नाही. संचलन करणार्यांना प्रवासी का दिसले नाहीत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
काय घडला प्रकार?
मेट्रोकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी सकाळी ११ पर्यंत मेट्रोच्या फेर्यांची संख्या वाढविलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर सकाळी ११ पर्यंत प्रत्येक साडेसात मिनिटाला ट्रेन धावते त्यानंतर प्रत्येक १० मिनिटाला ट्रेन आहे. सकाळी ११ वाजता सिव्हिल कोर्ट स्टेशनवर पिंपरी-चिंचवड करून मेट्रो ट्रेन आली. त्यानुसार वेळापत्रकाची स्क्रीन, तसेच घोषणा यंत्रणेवर गाडीची घोषणा झाली. ही गाडीही सिव्हील कोर्ट स्थानकावर आली.
त्यानंतर प्रवासी लगेच गाडीत बसले तर चालकही प्रवासी घेऊन पिंपरी-चिंचवडकडे निघाला. मात्र, शिवाजीनगर येताच नेहमीप्रमाणे मेट्रो स्थानकावर थांबली असता प्रवाशांना खाली उतरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे प्रवासी गोंधळून गेले. त्यांना ही गाडी व्यावसायिक संचलनाची नसून डेपोत जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व प्रवासी खाली उतरले. त्यानंतर ही ट्रेन पुढे निघून गेली. नंतर पंधरा मिनिटांनी आलेल्या दुसर्या मेट्रो ट्रेनने हे प्रवासी पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाले.
मेट्रोच्या सर्व प्रवाशांनी तिकिट काढलेले होते. त्यांना सिव्हिल कोर्ट येथे मेट्रोतही बसू देण्यात आले. मात्र, शिवाजीनगर येथे उतरविण्यात आले. त्यामुळे आपण स्वत: संबधित स्थानकातील मेट्रो कर्मचार्यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी दिलेले कारण हास्यास्पद होते. त्यांच्याकडून चक्क ही ट्रेन व्यावसायिक संचलनाची नाही, असे सांगत प्रवाशांना पुढच्या ट्रेन मध्ये बसण्यास सांगितले. – संजय शितोळे ( मेट्रो प्रवासी)