- तक्रार करणाऱ्याचे नाव केले उघड
- पालिकेतील प्रकाराने भलतीच डोकेदुखी
पुणे – शहरात निवासी मिळकतींचा व्यवसाय करणाऱ्या आणि कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्यासाठी पालिकेच्या करसंकलन विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यावर आलेल्या तक्रारीनंतर मिळकतीची तपासणी करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराचे नावच मिळकतधारकास सांगितले. त्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
“महापालिकेने आपल्या गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यानुसार संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या नागारिकाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. 12 जुलै रोजी हा प्रकार घडला. शहरात निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर वाढला आहे. मात्र, प्रत्यक्षात कर निवासी दरानेच भरला जातो. व्यावसायिक वापरामुळे संबंधित निवासी भागात वर्दळ वाढते. याबाबत नागरिकांच्याही तक्रारी येत आहेत. त्यावर पालिकेने अशा मिळकती शोधण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केला आहे.
त्यानुसार नागरिकांना 830-805-9999 या क्रमांकावर वापरात बदल झालेल्या अथवा कर आकारणी न झालेल्या मिळकतींची माहिती कळविता येणार आहे.दरम्यान, औंध भागातील एका नागरिकाने दि. 9 जुलै रोजी एका निवासी कर आकारणी मात्र प्रत्यक्षात व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतीची माहिती कळविली. त्यानुसार करसंकलन विभागाने पेठ निरीक्षकास माहिती दिली. त्यांनी तपासणी करून कार्यवाही करणे अपेक्षित होते. दरम्यान, दि. 12 जुलै रोजी कर्मचाऱ्याने संबंधित जागेचे फोटो घेत माहिती घेतली. मात्र, जाताना मिळकतधारकास तक्रारदाराचे नाव आणि इतर माहिती दिली. त्यामुळे तक्रारदार आणि संबंधित मिळकतधारकात जोरदार जुंपली आहे.
गोपनीयतेच्या भीतीने अत्यल्प प्रतिसाद
महापालिकेने हा क्रमांक जाहीर केलेला असला, तरी त्यावर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सुरुवातीचे काही दिवस 20 ते 25 तक्रारी येत होत्या. मात्र, आता हे प्रमाण दिवसाला दहापेक्षाही कमी झाले आहे. ज्या तक्रारी आल्या, त्यातील जवळपास 70 टक्के मिळकतींना महापालिकेने आधीच व्यावसायिकदराने कर आकारणी केली आहे. आपण तक्रार केली तरी त्याची गोपनीयता राहणार नाही. परिणामी वाद उद्भवतील म्हणून तक्रारदार पुढे येत नसल्याची स्थिती आहे.